“स्वाभिमान असता तर.”, सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेनंतर रोहित पवार यांचे मोठे विधान; अपघाताच्या चौकशीवरून पवार कुटुंबात मतभेद!

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरून पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अपघाताच्या तपासावरून प्रश्न उपस्थित केल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यावर प्रत्युत्तर दिले. “अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण करु नये, तपास यंत्रणेवर आमचा पूर्ण विश्वास आहे”, असे त्या म्हणाल्या होत्या. यानंतर आता पवार कुटुंबातून विविध विधाने समोर येत आहेत. आमदार रोहित पवार यांनी अतिशय आक्रमक पद्धतीने आपली भूमिका आज मांडली.

इतर प्रकरणांमध्ये तातडीने गुन्हे दाखल केले जातात. मात्र अजित पवार यांच्या अपघाताला इतके महिने होऊनही गुन्हा दाखल झालेला नाही, असे विधान करत सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. यावरून आता पवार कुटुंबात शाब्दिक संघर्ष निर्माण झाल्याचे दिसत आहे. रोहित पवार यांनी थेट स्वाभिमानाचा विषय पुढे करत महायुतीमध्ये सामील असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला डिवचले.

रोहित पवार काय म्हणाले?

“मी पवार कुटुंबातील व्यक्ती आहे. माझंही आडनाव पवार असून ज्यांचे निधन झाले, ते माझे काका आहेत. आपल्या काकांना न्याय मिळावा म्हणून पुतण्याचा प्रयत्न आहे. ते माझे नेतेही होते. राज्यातील एका मोठ्या नेत्याचा कुठल्यातरी कारणाने मृत्यू होतो. अशावेळी त्यांचा कार्यकर्ता या नात्याने त्यांच्या मृत्यूचा तपास योग्य पद्धतीने व्हावा अशी माझ्यासह राज्यातील कोट्यवधी लोकांची इच्छा आहे. पण दुर्दैवाने सरकारमधील लोक जे दादांना मित्र समजत होते, ते अजूनही दादांना न्याय देऊ शकले नाहीत”, अशी भूमिका रोहित पवार यांनी आज माध्यमांशी बोलत असताना मांडली.

आम्ही योग्य तपासासाठी प्रयत्न करत असताना ते कुणाला योग्य वाटत नसेल. तर ते त्यांनाच लखलाभ. आम्ही मराठी माणसे आहोत, स्वाभीमानी आहोत. आम्ही लढत राहू. जे सत्तेत असतील त्यांनी सत्तेचा वापर करून नेत्याला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. आम्ही विरोधात आहोत, आमच्यापद्धतीने आम्ही लढत राहू.

एक गोष्ट यावेळी नमूद करतो. मला जे योग्य वाटते, ते मी करत राहीन. यात मी कुणाचेही काही ऐकूण घेत नाही. आज मी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाचे सादरीकरण करणार होतो. मात्र आणखी काही माहिती समोर येत असल्यामुळे मी ही पत्रकार परिषद पुढे ढकलली आहे.

सुप्रिया सुळेंच्या विधानावर काय म्हणाले?

सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या मृत्यूनंतर एफआयआर दाखल न झाल्याबद्दल खंत व्यक्त केली होती. या विधानाला रोहित पवार यांनी पाठिंबा दिला. अपघाताबद्दल एफआयआर दाखल करण्यासाठी आम्ही राज्यात तीन ठिकाणी जाऊन आलो. मात्र आम्हाला दाद दिली नाही. कर्नाटकमध्ये याबाबतीत एफआयआर दाखल होत असेल तर सरकारला लाज वाटायला हवी, असा आरोप रोहित पवार यांनी केला.

‘स्वाभिमान असता तर सत्तेच्या बाहेर गेले असते’

रोहित पवार पुढे म्हणाले, अजित पवारांच्या पक्षातील ४० आमदारांनी अपघाताचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. त्याबद्दल त्यांना स्मरण पत्रही द्यावे लागले. तुमच्या सरकारमध्ये तुम्हाला स्मरण पत्र द्यावे लागत असेल आणि त्यालाही केराची टोपली दाखवली जात असेल तर हे दुर्दैवी आहे. स्वाभिमानी लोक असते तर ते लगेच सत्तेच्या बाहेर गेले होते. स्वाभिमान सगळ्यांकडेच असतो असे नाही. स्वाभिमान टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्याप्रमाणे आम्ही लढत आहोत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button