
राजमार्ग’ आता कोकण-कोल्हापुरातून थेट महाराष्ट्राच्या शाळांपर्यंत!
बोर्ड परीक्षेची धावपळ होणार कमी; वर्षभराच्या नियोजनाचा आराखडा राज्य मंडळाकडून स्वीकारला
रत्नागिरी : प्रतिनिधी
बोर्ड परीक्षा तोंडावर आली की शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुरू होणारी प्रशासकीय धावपळ, अभ्यासक्रम पूर्ण करण्याची लगबग आणि विद्यार्थ्यांवरील वाढता परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळांनी सुरू केलेल्या ‘बोर्ड परीक्षेचा राजमार्ग’ या अभिनव उपक्रमाला आता राज्यस्तरीय स्वरूप मिळाले आहे. विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या उपक्रमाची दखल घेत राज्य मंडळाने तो संपूर्ण महाराष्ट्रातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे राज्य मंडळाच्या ‘शिक्षण संक्रमण’ सप्टेंबर मासिकातून हा नियोजन आराखडा राज्यातील शैक्षणिक संस्थांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे कोकण आणि कोल्हापूर विभागातील प्रयोग आता महाराष्ट्रातील शाळांच्या परीक्षा व्यवस्थापनाला दिशा देणार आहे.
बोर्ड परीक्षा म्हणजे केवळ प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि निकालाची प्रक्रिया नाही. त्यामागे विद्यार्थ्यांची उपस्थिती, अभ्यासक्रम पूर्णता, घटकनिहाय अध्यापन, सराव चाचण्या, उत्तरलेखन, शंका निरसन, पालकांशी संवाद, परीक्षा अर्ज आणि मंडळाशी संबंधित विविध प्रशासकीय प्रक्रियांचा समावेश असतो.
या सर्व बाबी परीक्षेच्या आधी अचानक करण्याऐवजी संपूर्ण वर्षाचे नियोजन टप्प्याटप्प्याने करण्याची संकल्पना ‘राजमार्गा’तून मांडण्यात आली आहे. कोणते काम केव्हा करायचे, कोणाची जबाबदारी काय, विद्यार्थ्यांच्या तयारीचा आढावा कोणत्या टप्प्यावर घ्यायचा आणि आवश्यक त्या वेळी कोणत्या उपाययोजना करायच्या, याचे दिशादर्शन या आराखड्यात करण्यात आले आहे.
राज्यातील सर्व शाळांची परिस्थिती एकसारखी नाही. शहरी, ग्रामीण तसेच विविध सामाजिक-शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या संस्थांच्या अडचणी वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे सर्वांसाठी एकच पद्धत लादण्याऐवजी ‘एकच दिशा, पण गरजेनुसार नियोजन’ हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे.
अभ्यासक्रम पूर्ण करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना संकल्पना कितपत समजल्या आहेत, कोणते विषय किंवा घटक कठीण जात आहेत आणि कोणत्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त मार्गदर्शनाची गरज आहे, याचा सातत्याने आढावा घेण्यावर भर देण्यात आला आहे.
बोर्ड परीक्षेच्या तयारीत सर्व विद्यार्थ्यांकडून समान अपेक्षा ठेवण्याऐवजी त्यांच्या शैक्षणिक गरजा ओळखण्यावर भर देण्यात आला आहे. मूलभूत संकल्पना समजण्यात अडचण असलेल्या विद्यार्थ्यांची वेळेत ओळख करून त्यांच्यासाठी अतिरिक्त मार्गदर्शन, सराव, शंका निरसन आणि विशेष शैक्षणिक उपक्रम राबविण्याची भूमिका या उपक्रमातून मांडण्यात आली आहे.
विद्यार्थ्याची बोर्ड परीक्षेची तयारी केवळ शाळेपुरती मर्यादित राहू नये, यासाठी पालकांशी नियमित संवाद ठेवण्यावरही भर देण्यात आला आहे. उपस्थिती, अभ्यासातील प्रगती, अडचणी आणि परीक्षेपूर्व तयारी याबाबत पालकांना माहिती दिल्यास विद्यार्थ्याला अधिक सकारात्मक वातावरण मिळू शकते.
कोकण आणि कोल्हापूर विभागातून सुरू झालेल्या या प्रयोगाची राज्य मंडळाने दखल घेत त्याचा विस्तार महाराष्ट्रभर करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक पातळीवरील उपयुक्त संकल्पनेला राज्यस्तरावर मान्यता मिळणे, हे या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य मानले जात आहे.
राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी आणि सचिव डॉ. दीपक माळी यांनी ‘शिक्षण संक्रमण’च्या विशेषांकात मंडळाच्या विविध योजनांनाही स्थान दिले आहे. त्यामुळे परीक्षा व्यवस्थापनासोबत मंडळाच्या विविध उपक्रमांची माहितीही शाळांना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
ऑगस्टअखेरीस झालेल्या ऑनलाइन बैठकीत कोल्हापूर विभागातील सुवर्णा सावंत (कोल्हापूर), राजेसाहेब लोंढे (सांगली), धनंजय चोपडे (सातारा) तसेच कोकण विभागातील दीपक मेंगाने (रत्नागिरी), विनायक पाटील (सिंधुदुर्ग) या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी हा उपक्रम आणखी प्रभावीपणे राबविण्याचा मनोदय व्यक्त केला.
मुख्याध्यापक संघाचे राज्य उपाध्यक्ष सचिन नलावडे, संदेश राऊत तसेच पाचही जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष आर. डी. पवार (कोल्हापूर), संजयकुमार झांबरे (सांगली), वामन तरफे (सिंधुदुर्ग), आयुब मुल्ला (रत्नागिरी), संजय यादव (सातारा) यांनीही राज्य मंडळाच्या या निर्णयाचे स्वागत केले.
“मागील वर्षापासून सुरू केलेल्या या सर्वसमावेशक उपक्रमास उत्तम प्रतिसाद मिळाला. परीक्षा नियोजन सुलभ झाले. राज्य मंडळाने या उपक्रमाची दखल घेऊन त्याचा राज्यस्तरावर विस्तार केला, ही समाधानाची बाब आहे,” असे विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
बोर्ड परीक्षेचा निकाल हा काही महिन्यांच्या अभ्यासाचा परिणाम नसतो; त्यामागे संपूर्ण वर्षाचे नियोजन असते. कोकण आणि कोल्हापुरात आकाराला आलेला हाच ‘राजमार्ग’ आता महाराष्ट्रातील शाळांच्या परीक्षा व्यवस्थापनाला नवी दिशा देणार आहे.




