
ज्ञान, कौशल्य आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या आधारे प्रगती करा. — प्रांताधिकारी जीवन देसाई
रत्नागिरी, दि. ४ : भविष्यात स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी शालेय जीवनात घेतल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्ती परीक्षांना मोठे महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी ज्ञान, कौशल्य आणि सकारात्मक दृष्टिकोन जोपासत स्वतःची प्रगती साधावी आणि आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे, असे प्रतिपादन रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी केले.
रत्नागिरी येथील पटवर्धन हायस्कूलमध्ये आयोजित शिष्यवृत्ती गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते. ४ सप्टेंबर रोजी प्रशालेत इयत्ता पाचवी, सातवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी देसाई म्हणाले की, शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या स्पर्धात्मक वृत्तीला चालना देतात. अशा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नियोजन, सातत्य, मेहनत आणि आत्मविश्वासाचे महत्त्व समजते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच विविध स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्याची सवय लावून घ्यावी.
इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या वेदांत संदीप पोवार याचा विशेष गौरव करण्यात आला. भारत शिक्षण मंडळाचे कार्यवाह धनेश रायकर यांनी वेदांतला सायकल बक्षीस देऊन त्याचे कौतुक केले.
या गुणगौरव सोहळ्यास रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई, माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, विस्तार अधिकारी संदेश कडव, सौ. मयुरी देसाई, सौ. ज्योती गावंड, गणेश गुळवणी, भारत शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीराम भावे, कार्यवाह धनेश रायकर, पदाधिकारी चंद्रकांत घवाळी, मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर, शिक्षकवृंद, पालक प्रतिनिधी तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशामागे सातत्यपूर्ण मेहनत घेणाऱ्या शिक्षकांचेही विशेष अभिनंदन करण्यात आले.




