
सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयाचा ‘सर्वोत्कृष्ट राधाकृष्ण’ स्पर्धेत प्रथम क्रमांक कियांश संतोष गोरीवले याने मिळविला मानाचा किताब; विशेष राधाकृष्ण स्पर्धेतही विद्यार्थ्यांचे यश

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी श्री राधाकृष्ण मंदिर, वैश्य संस्था, रत्नागिरी यांच्या वतीने गुरुवार, दिनांक ३ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या उत्कृष्ट राधाकृष्ण तसेच उत्कृष्ट कृष्ण स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले.

या स्पर्धेत प्रशालेच्या वतीने सहभागी झालेल्या कियांश संतोष गोरीवले याने आपल्या आकर्षक व मनमोहक राधाकृष्ण वेशभूषेने परीक्षकांची मने जिंकत ‘सर्वोत्कृष्ट राधाकृष्ण’ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. कियांशच्या या यशामुळे प्रशालेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या स्पर्धेत प्रशालेतील महमद उस्मान ककेरी, दुर्वांग समीर चव्हाण, आर्या राकेश सावंत, पल्लवी रामू चव्हाण आणि आचल शत्रुघ्न चवरे यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत ‘विशेष राधाकृष्ण’ म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांना मिळालेले शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची मेहनत यांचा मोठा वाटा आहे. स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांची नावे नोंदविण्यापासून ते त्यांना स्पर्धेच्या ठिकाणी घेऊन जाणे-आणणे आणि संपूर्ण स्पर्धेदरम्यान त्यांना प्रोत्साहन देणे, या सर्व कामात श्रीमती वैभवी नाखरेकर, श्रीमती पूनम नाटेकर आणि श्री सचिन गावडे यांनी उत्साहाने कार्य केले.
तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सुंदर व आकर्षक राधाकृष्ण वेशभूषेत सजविण्यासाठी त्यांच्या पालकांनी घेतलेल्या मेहनतीचेही विशेष कौतुक करण्यात आले. विशेषतः कियांश गोरीवले व त्याचे पालक श्री. संतोष गोरीवले यांच्या योगदानाचे अभिनंदन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शालेय समितीचे अध्यक्ष राजनजी मलुष्टे, संस्था पदाधिकारी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. संजना तारी, पालकवर्ग, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे प्रशालेत आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, कियांश संतोष गोरीवले याच्या ‘सर्वोत्कृष्ट राधाकृष्ण’ स्पर्धेतील प्रथम क्रमांकाबद्दल सर्व स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




