कार्यभार स्वीकारताच तुकाराम मुंढे ‘ॲक्शन मोड’ वर! राज्यभरात भेसळखोरांवर अभूतपूर्व कारवाई; ३ दिवसांत ५३ धाडी, ३४ ठिकाणी कारवाई तर ३३ जणांना ठोकल्या बेड्या!


  • अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी २५ मे रोजी कार्यभार घेताच राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना धाडी व जप्तीची विशेष मोहीम राबविण्याबाबत निर्देश दिलेले होते. त्यानुसार राज्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या विभागात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळखोर, प्रतिबंधित गुटखा विक्रेते, अस्वच्छ अन्न उत्पादक आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनांविरोधात अभूतपूर्व, अशी धडक कारवाई सुरू आहे.

गत तीन दिवसांत तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी राज्यातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर छापे टाकून प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू, भेसळयुक्त दूध, नियमबाह्य खाद्यपदार्थ, असुरक्षित उत्पादन प्रक्रिया आणि दिशाभूल करणारे पॅकिंग यावर कठोर कारवाई केलेली आहे.

या मोहिमेत गुटखा, पानमसाला व तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थाच्या प्रकरणी ५३ आस्थापनांची तपासणी केलेली असून त्यातील ३४ ठिकाणी गुटखा, पानमसाला व तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थाची विक्री होत असल्याचे आढळून आले. एकूण २५ एफआयआर दाखल करून ३३ व्यक्तींना अटक केलेली आहे. ५ वाहने जप्त करून २७ आस्थापना सील केलेल्या आहेत.

या प्रकरणी सुमारे २०,५७,२९६ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे, त्यापैकी बृहन्मुंबई विभागात १९ आस्थापनांची तपासणी करून १९ आस्थापना सील केलेल्या आहेत, १९ व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

निकृष्ट बाटलीबंद पाण्यावर कारवाई

गुटखा, पानमसाला व तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थाच्या व्यतिरिक्त प्रशासनाच्या बृहन्मुंबई, कोंकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या विभागातील अधिकाऱ्यांनी २३ आस्थापनांची तपासणी करून पॅकबंद पिण्याचे पाणी, दूध, नुडल्स, कार्बोनेटेड वॉटर, खाद्यतेल, स्वीट व फरसाण, आईसक्रीम, ताडी, डिंक, मसाले, खवा, पनीर, तूप, बेसन व बेकारी पदार्थ या अन्नपदार्थाचा सुमारे २८ लाख ७८ हजार ५७२ रुपये किंमतीचा साठा जप्त करून त्याचे विश्लेषणासाठी नमुने घेतले आहेत.

जळगाव गायीच्या दुधात भेसळ

धरणगाव तालुक्यातील एका व्यक्तीकडून गायीच्या दुधात खाद्यतेल मिसळून कृत्रिम दूध तयार केले जात असल्याचे उघड झाले. संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत

पुण्यात रसायनांनी पिकवलेले आंबे जप्त

इंदापूर येथील एका आस्थापनात आंबे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी इथिलीन रसायनांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. सुमारे ₹२०,००० किमतीचे आंबे जप्त करून नष्ट करण्यात आले.

धुळ्यात अस्वच्छ परिस्थितीत मटर बेसन उत्पादन

धुळे जिल्ह्यातील एका आटा मिलमध्ये अत्यंत अस्वच्छ वातावरणात मटर बेसन तयार केले जात असल्याचे आढळले. सुमारे ₹१४ लाख किमतीचा साठा जप्त करण्यात आला.

मुंबईत नियमबाह्य नूडल्स उत्पादनावर कारवाई

धारावीतील एका उत्पादन केंद्रात लेबलिंग नियमांचे उल्लंघन करून नूडल्सचे उत्पादन सुरू असल्याचे आढळले. मोठ्या प्रमाणावर साठा जप्त करण्यात आला.

नाशिकमध्ये बनावट लेबलिंग आणि परवाना उल्लंघन

नाशिक परिसरात परवाना नसताना खाद्यपदार्थ उत्पादन, बनावट लेबलिंग आणि निकृष्ट दर्जाचे तेल विक्री करणाऱ्या अनेक आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.

पालघरमध्ये अस्वच्छ आईस्क्रीम उत्पादन

पालघर जिल्ह्यातील एका आस्थापनात अस्वच्छ वातावरणात आईस्क्रीम उत्पादन होत असल्याचे आढळून आले. लाखोंचा साठा जप्त करण्यात आला.

भेसळखोरांवर फौजदारी कारवाई – तुकाराम मुंढे

अन्न सुरक्षा व मानके कायद्याखाली गुन्हे करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हे दाखल (चाप्टर केसेस दाखल करून त्यांच्या कडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यात येणार आहे. त्यांनी पुन्हा गुटखा विक्री करून वा अन्नात भेसळ करून गुन्हा केल्यास त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा आस्थापनाला प्रशासनाकडून कोणतीही सवलत दिली जाणार नाही. भेसळ, प्रतिबंधित पदार्थांची विक्री आणि असुरक्षित अन्न उत्पादनाविरोधातील कारवाई यापुढे अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण असेल, असेही मुंढे यांनी म्हटले आहे.

भेसळ असेल तर नागरिकांनी तक्रार करावी

अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत शंका असल्यास किंवा भेसळीची माहिती मिळाल्यास नागरिकांनी त्वरित अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा. नागरिकांनी तक्रार करतेवेळी स्वतःचे नाव व पत्ता/संपर्क क्रमांक तक्रारीत नमूद करावा. भेसळ होणाऱ्या ठिकाणाचा वा आस्थापनेचा अचूक पत्ता व कोणत्या अन्नपदार्थात भेसळ केली जाते याची विशिष्ट माहिती तक्रारीत नमूद करावी. तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button