शासकीय महसूल व गौण खनिज वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करा; अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून धडक कारवाया कराव्यातविभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांचे निर्देश


रत्नागिरी, दि. २ ) – महसूल गोळा करणे हे महसूल विभागाचे प्राथमिक आणि सर्वात महत्त्वाचे कर्तव्य आहे, त्यामुळे यात कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही. शासकीय महसूल आणि गौण खनिज वसुलीची सद्यस्थिती समाधानकारक नसून, अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात न बसता प्रत्यक्ष फिल्डवर उतरून दंडात्मक कारवाया कराव्यात, असे कडक निर्देश कोकण विभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिले.
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित महत्त्वपूर्ण महसूल आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीस जिल्हाधिकारी मनुज जिंदल, अपर आयुक्त फरोग मुकादम, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, प्रांताधिकारी जीवन देसाई, वैशाली पाटील, आकाश लिगाडे, डॉ. विजय सूर्यवंशी, विश्वजीत गाताडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तहसीलदार उपस्थित होते.
मूळ कामात हलगर्जी नको, प्रलंबित प्रकरणे शून्यावर आणा
वसुलीच्या संथ गतीवर नाराजी व्यक्त करताना आयुक्त श्रीमती अगरवाल म्हणाल्या, “गौण खनिज आणि महसूल वसुलीबाबत अपेक्षित काम झालेले नाही. याचा अर्थ जिल्ह्यात सर्व नियमानुसार सुरू आहे का? जे मूळ काम आहे त्यातच ढिलाई दिसत असून, ही कार्यपद्धती तातडीने सुधारायला हवी. अर्धवट राहिलेली कामे आणि प्रलंबित केसेसची संख्या तातडीने शून्यावर आली पाहिजे.”
नागरिकांना आपल्या कामांसाठी वरिष्ठ कार्यालये अथवा मंत्रीमहोदयांकडे जायला लागू नयेत, यासाठी स्थानिक पातळीवरच पुढाकार घेऊन सर्व प्रकरणांचा निपटारा करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
बैठकीमध्ये आंबा-काजू नुकसान भरपाई अनुदान वाटप, ॲग्रीस्टॅकची कामे, बीएसएनएल टॉवर जागा वाटप, मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजना, नवीन वाळू धोरण, अतिक्रमण नियमानुकूल करणे, वन क्षेत्राच्या नोंदी आणि लँड बँक निर्मिती यांसारख्या विविध विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
रत्नागिरी पोलिसांच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा गौरव
बैठकीच्या सुरुवातीला पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पोलीस विभागाच्या ‘मिशन राईझिंग’ अंतर्गत अधिनिर्णय, मिशन जीवन, रेड्स ॲप, मिशन रॅपिड, फिनिक्स प्रगती, प्रतिसाद या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित डिजिटल उपक्रमांचे आणि सायबर गुन्हे नियंत्रणाचे सादरीकरण केले. या अभिनव प्रयोगांचे कौतुक करत आयुक्त श्रीमती अगरवाल यांनी पोलिसांच्या कामाची प्रशंसा केली, तसेच शासनाच्या नशामुक्ती अभियानावरही अधिक भर देण्याचे आवाहन केले.
‘स्वीप’ स्वाक्षरी मोहिमेने जनजागृती
२६६-रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाच्या प्रारूप मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत ‘स्वीप’ मोहिमेचा फलक प्रदर्शित करण्यात आला. “प्रारूप मतदार यादीमध्ये माझे नाव समाविष्ट झाले आहे; तुम्ही तुमच्या नावाची पडताळणी केलीत का?” या जनजागृती फलकावर विभागीय आयुक्त श्रीमती अगरवाल, जिल्हाधिकारी श्री जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, सहायक पोलीस अधीक्षक आरांक्षा यादव यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी करून नागरिकांना आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button