
‘कृषी यांत्रिकीकरण योजने’अंतर्गत ३४६७ शेतकऱ्यांची निवडकागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन
*रत्नागिरी, दि. १ :- कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांची कृषी उत्पादनक्षमता वाढविणे, श्रम बचत करणे व आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या “कृषी यांत्रिकीकरण योजने”तंर्गत सन २०२६-२७ वर्षासाठी जिल्ह्यातील ३ हजार ४६७ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. “प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या पद्धतीनुसार ही निवड करण्यात आली असून, निवड झालेल्या शेतकऱ्यांनी निवड झाल्यापासून १० दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
जिल्ह्यात प्रामुख्याने पॉवर टिलर, पॉवर विडर, ग्रास कटर, चेन सॉ, पॉवर स्प्रेअर आणि भात मळणी यंत्र यांसारख्या आधुनिक कृषी यंत्रांची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. या योजनेसाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांनी आपण अर्ज केलेल्या यंत्र किंवा अवजाराची आवश्यक कागदपत्रे (उदा. दरपत्रक, टेस्ट रिपोर्ट, जात प्रमाणपत्र इ.) महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर ‘अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी’ द्वारे लॉग इन करून अपलोड करणे बंधनकारक आहे.
विहित मुदतीत कागदपत्रे अपलोड न केल्यास महाडीबीटी पोर्टलद्वारे संबंधित शेतकऱ्याचा अर्ज रद्द होवू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही विलंब न करता सीएससी केंद्राद्वारे किंवा वैयक्तिकरित्या कागदपत्र अपलोड करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन कृषी विभातर्फे करण्यात आले आहे. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी गाव पातळीवरील सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
तालुकानिहाय निवड झालेले लाभार्थी पुढीलप्रमाणे आहेत. मंडणगड 315, दापोली 367, खेड 307, चिपळूण 331, गुहागर 368, संगमेश्वर 388, रत्नागिरी 492, लांजा 424, राजापूर 375



