महावितरणची वीज गायब; घामाच्या धारांत अंधारातच ग्रामसभा!अडीच ते तीन तास उकाड्यात मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात दळे ग्रामसभा;

तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी जब्बार काझी यांची बिनविरोध निवड


राजापूर : महावितरणचा वीजपुरवठा खंडित झाल्याने अडीच ते तीन तास प्रचंड उकाड्यात घामाच्या धारांत ग्रामस्थांना अंधारातच ग्रामसभा पार पाडावी लागली. सभास्थळी पुरेसा प्रकाश नसल्याने अनेक ग्रामस्थांनी मोबाईलच्या टॉर्चचा आधार घेतला. वीजपुरवठा नसतानाही ग्रामस्थांनी संयम राखत विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. दरम्यान, महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी जब्बार काझी यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड करण्यात आली.
दळे ग्रुप ग्रामपंचायतीची ग्रामसभा प्रशासक तथा शिक्षण विस्तार अधिकारी सुनील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ग्रामसभेचे सचिव म्हणून मुख्याध्यापक अरुण सुर्वे यांनी काम पाहिले, तर ग्रामसेवक गोरक्ष शेलार यांनी त्यांना सहकार्य केले.
ग्रामसभेच्या सुरुवातीला शासनाकडून प्राप्त परिपत्रकांचे वाचन तसेच मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांनी विविध प्रश्न उपस्थित करून त्यावर चर्चा केली.
महिला बचत गटांच्या निधीचा मुद्दा
ग्रामसभेला महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. महिला बचत गटांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीबाबत माहिती घेण्यासाठी अनेक महिला उपस्थित होत्या. आतापर्यंत महिला बचत गटांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निधी मिळत नसल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. बचत गटांसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजना, निधी आणि त्यासाठीची प्रक्रिया याबाबत ग्रामस्थांना स्पष्ट माहिती देण्याची मागणी करण्यात आली.
कांदळवन समितीच्या कामाबाबत प्रश्न
कांदळवन समितीची स्थापना होऊनही तिचा ठराव समितीच्या अध्यक्षांना मिळालेला नसल्याचा मुद्दाही ग्रामस्थांनी उपस्थित केला. समिती स्थापन होऊनही कांदळवन प्रकल्पांतर्गत उपलब्ध विविध योजनांचा लाभ दळे गावाला अद्याप मिळालेला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याबाबत प्रशासनाने स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी जब्बार काझी
महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी जब्बार काझी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यापूर्वी स्थापन झालेल्या समितीचा ठराव मुदत संपण्याच्या अवघ्या महिनाभर आधी मिळाल्याचा मुद्दा काझी यांनी उपस्थित केला. यामागील कारण स्पष्ट झाले नसल्याचे सांगत, यापुढे समिती स्थापन झाल्यानंतर ठराव तातडीने अध्यक्षांकडे देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
ग्रामसभेसाठी पुरेशी बैठक व्यवस्था नसल्याने नाराजी
ग्रामसभेसाठी पुरेशी बैठक व्यवस्था नसल्याबद्दलही ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. ग्रामसभा घेण्यासाठी मोठी व पुरेशी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी यापूर्वीही करण्यात आली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दळे ग्रुप ग्रामपंचायतीची इमारत नेमकी कोणाच्या जागेत आहे, याबाबत सत्यवान जाधव यांनी प्रश्न उपस्थित केला. यासंदर्भातील कागदपत्रे व वस्तुस्थिती ग्रामस्थांसमोर स्पष्ट करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
ग्राम सुरक्षा दल, दारूबंदी समितीचा मुद्दा
ग्राम सुरक्षा दल तसेच दारूबंदीशी संबंधित समितीची स्थापना या ग्रामसभेत होऊ शकली नाही. दारूबंदीची जबाबदारी केवळ ग्रामस्थांवरच का सोपविली जाते? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. शासन व पोलिस यंत्रणा कार्यरत असतानाही गावातील दारूविक्रीला आळा का बसत नाही, असा प्रश्नही ग्रामस्थांनी उपस्थित केला. ग्रामस्थांचा रोष शासनाच्या निदर्शनास आणून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
ग्रामपंचायतीच्या माहितीसाठी व्हॉट्सॲप ग्रुपची सूचना
ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, ग्रामसभेचे निर्णय तसेच शासनाकडून प्राप्त होणारी माहिती ग्रामस्थांपर्यंत वेळेवर पोहोचावी, यासाठी स्वतंत्र व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्याची सूचना प्रशासक तथा अध्यक्ष सुनील पाटील यांनी केली. या सूचनेचे ग्रामस्थांनी स्वागत केले.
यापूर्वीही अशा प्रकारचा व्हॉट्सॲप ग्रुप सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्याने अनेक शासकीय योजना व ग्रामपंचायतीशी संबंधित माहिती ग्रामस्थांपर्यंत वेळेवर पोहोचत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे व्हॉट्सॲप ग्रुप तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
प्रश्नांवर सविस्तर चर्चा
प्रशासक सुनील पाटील यांनी ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांवर संयमाने चर्चा करत अनेक विषयांची सविस्तर माहिती दिली. त्यामुळे सुमारे अडीच ते तीन तास चाललेली ग्रामसभा वीजपुरवठा खंडित असतानाही शांततापूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
ग्रामसभेला राजन लाड, महेश करगुटकर, जब्बार काझी, समीर शिरवडकर, विजय गोरिवले, प्रियांका गुरव, रेशम लाड, सत्यवान जाधव, संजय लासे, नैषदा गिरकर, स्नेहल गिरकर, डॉ. सिद्धेश पडवळ, प्रभाकर खानविलकर, सुनीता गुरव, दीक्षा साकरकर, वंदना जाधव, सांची साखरकर, सिद्धी शिरसेकर, गणेश बाणे, पिंट्या शिरवडकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button