
सल्फर पावडर प्रकरणातील गूढ उकलले; पोलिस यंत्रणेने टाकला सुटकेचा निश्वास
चौकशी पूर्ण करून पथक ठाण्याला रवाना; युट्युब व्हिडीओ पाहून प्रयोग केल्याची माहिती
खेड : तालुक्यातील एका १७ वर्षीय तरुणाने ऑनलाइन माध्यमातून तब्बल एक किलो सल्फर पावडर मागविल्याने निर्माण झालेल्या संशयाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या चौकशीला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. संबंधित तरुणाने युट्युबवरील व्हिडीओ पाहून लोखंड वितळविण्याची प्रक्रिया समजून घेत त्यापासून चमचे तयार करण्याचा प्रयोग करण्याच्या उद्देशाने सल्फर पावडर मागविल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. प्रयोग केल्यानंतर उर्वरित रसायन मातीत टाकून दिल्याचेही समोर आले आहे.
१७ वर्षीय मुलाने एक किलो सल्फर पावडर मागविल्याची माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणाकडे पोलिसांसह विविध यंत्रणांचे लक्ष वेधले गेले होते. मोठ्या प्रमाणात सल्फर पावडर मागविण्यामागे नेमका काय उद्देश होता, याबाबत विविध शक्यता व्यक्त केल्या जात होत्या. त्यामुळे पोलिस यंत्रणेने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत चौकशी सुरू केली होती.
चौकशीदरम्यान संबंधित तरुणाकडून सल्फर पावडर मागविण्यामागील कारणाची माहिती घेण्यात आली.
युट्युबवरील व्हिडीओ पाहिल्यानंतर लोखंड वितळविण्याची प्रक्रिया पाहून त्यापासून चमचे बनविण्याचा प्रयोग करून पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली. त्यातूनच त्याने सल्फर पावडर मागविल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती मिळाली आहे.
प्रयोग केल्यानंतर संबंधित रसायन त्याने मातीत टाकून दिल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणामागे कोणताही गंभीर अथवा घातक हेतू नसल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आल्याने पोलिस यंत्रणेने सुटकेचा निश्वास टाकला आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पूर्ण करून संबंधित पोलिस पथक ठाण्याकडे रवाना झाले आहे. या प्रकरणातील सर्व बाबींची पडताळणी करण्यात आली असून, पुढील कार्यवाही वरिष्ठांच्या निर्देशानुसार केली जाणार असल्याची माहिती आहे.
सल्फर पावडरसारख्या रसायनांचा वापर करताना योग्य माहिती व सुरक्षा साधनांशिवाय प्रयोग करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अशा रसायनांशी संबंधित प्रयोग करताना पालकांनी तसेच संबंधितांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.




