
शिवाईनगरात वादळी वाऱ्याने झाडे उन्मळली; वीजपुरवठा तत्काळ पूर्ववत
नगरसेवक व पालिका, अग्निशमन विभाग तसेच महावितरण कर्मचाऱ्यांची युद्धपातळीवर कार्यवाही
खेड : शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील शिवाईनगर परिसरात अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने विद्युत वाहिन्या व विद्युत पोलांचे नुकसान झाले. परिणामी परिसरातील वीजपुरवठा काही काळ विस्कळीत झाला.
घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे गटनेते तथा प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक निकेतन अनंत पाटणे आणि नगरसेवक प्रेमळ चिखले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.
दरम्यान, खेड नगर परिषदेच्या स्वच्छता विभाग व अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी समन्वय साधत युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले. रस्त्यावर व विद्युत वाहिन्यांवर पडलेली झाडे बाजूला करण्यात आली. त्यानंतर नुकसानग्रस्त विद्युत वाहिन्या व पोलांची आवश्यक दुरुस्ती करून परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.
या तत्पर कार्यवाहीमुळे संभाव्य दुर्घटना व धोका टळला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. आपत्कालीन परिस्थितीत लोकप्रतिनिधी, नगर परिषद प्रशासन आणि वीज वितरण विभागातील कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या समन्वयाबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
वादळी वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत तातडीने उपाययोजना करून नागरिकांची गैरसोय दूर करण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यतत्परतेचेही कौतुक होत आहे.




