
सीजेपीची उद्या ‘तिरंगा सभा’; दास, रांका तिहार तुरुंगाच्या कोठडीत, विरोधी पक्षांचा संताप, आंदोलन तीव्र!
नवी दिल्ली : जंतर-मंतरवर जाताना खासगी जागेत बेकायदा प्रवेश केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी कॉक्रोच जनता पार्टी (‘सीजेपी’) चे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना बुधवारी अटक केली. न्यायालयाने त्यांची पाच दिवसांच्या कोठडीसाठी तिहार तुरुंगात रवानगी केली आहे.
या घटनेनंतर दिल्लीतील वातावरण पुन्हा ढवळून निघाले असून विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ‘जंतर-मंतर’ ताब्यात घेण्याचा इशारा दिला. ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी ही ‘अघोषित आणीबाणी’ असल्याची टीका करताना येत्या शुक्रवारी सायंकाळी दिल्लीत ‘तिरंगा सभे’साठी जमण्याचे आवाहन केले आहे.
‘एसआयआर’विरोधी आंदोलनाचे केंद्र ठरलेल्या जंतर-मंतरला आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळण्याचे दिल्ली पोलिसांनी जाहीर केले आहे. मात्र, ‘सीजेपी’च्या पदाधिकार्यांनी मंगळवारी बॅरिकेड ओलांडून जंतर-मंतरवर प्रवेश केला. त्यावेळी आशुतोष रांका, सौरव दास, अजिंक्य शिंदे यांच्यासह ११ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यापैकी रांका आणि दास यांनी आधीच्या बंधपत्रातील शर्तींचा भंग केल्याप्रकरणी त्यांना प्रतिबंधात्मक अटक करण्यात आली तर, अजिंक्य शिंदे यांच्याकडून सहा महिने शांतता भंग न करण्याची हमी घेऊन जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली. विशेष कार्यकारी दंडाधिकार्यांनी रांका आणि दास यांना पाच दिवसांच्या कोठडीसाठी तिहार कारागृहात पाठवण्याचे आदेश दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
‘सीजेपी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी या कारवाईची तुलना ब्रिटिश राजवटीतील स्वातंत्र्यसैनिकांच्या अटकेशी केली. ‘या देशात तिरंगा फडकवणे हा गुन्हा आहे का? ब्रिटिशांच्या काळात सार्वजनिक ठिकाणी तिरंगा फडकवणार्या स्वातंत्र्यसैनिकांना अटक केली जात होती. मोदी सरकारही तेच करत आहे,’ असा आरोप दिपके यांनी केला. दरम्यान दिपके यांनी दिल्लीतील नागरिकांना तिरंगा घेऊन येत्या शुक्रवारी कनॉट प्लेस येथे सायंकाळी पाच वाजता जमण्याचे आवाहन केले आहे. तिरंगा फडकावणे हा गुन्हा नाही हे आम्ही दाखवून देऊ दिपके यांनी नमूद केले. ज्यांना दिल्लीत येणे शक्य नाही त्यांनी आपल्या गावांमध्येच तिरंगा हातात घेऊन एकत्र जमावे अशी सूचना त्यांनी केली.
‘सीजेपी’ नेत्यांवरील कारवाईनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी संताप व्यक्त केला. ‘एसआयआर’ आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सीजेपी आणि ‘इंडिया’ आघाडी स्वतंत्रपणे आंदोलने करत असताना बुधवारी प्रथमच विरोधी पक्ष ठामपणे सीजेपीच्या मागे उभा राहिल्याचे दिसून आले.
‘जंतर-मंतरवर तिरंगा फडकवणे हा गुन्हा नाही. त्यासाठी तरुणांना तुरुंगात डांबणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे,’अशी टीका राहुल यांनी केली. ‘जंतर मंतर हे भारताच्या जनतेचे आहे. ते आम्ही पुन्हा मिळवू,” असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. या विधानावर प्रतिहल्ला करताना ‘राज्यघटना निदर्शने करण्याची परवानगी देते, कायद्याचे उल्लंघन करण्याचे नाही. ‘सीजेपी’ नेत्यांवर केलेल्या कारवाईवर टीका करून राहुल गांधी देशाची दिशाभूल करत आहेत,’ असा आरोप भाजपचे राष्ट्रीय माध्यम संयोजक आशिष उषा अगरवाल यांनी केला.
निदर्शने सुरूच
दिल्लीतील आंदोलनाचे केंद्र पुन्हा बदलत बुधवारी पटेल चौकात काँग्रेसची विद्यार्थी संघटना, एनएसयूआय व युवक काँग्रेस तसेच, अन्य संघटनांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले. जंतर मंतरवरील निर्बंध आणि सीजेपी नेत्यांच्या अटकेच्या निषेधार्थ मोठ्या संख्येने विद्यार्थी व युवक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. १० ऑक्टोबरपासून मध्य दिल्लीमध्ये दररोज आंदोलने होत असून त्याची व्याप्तीही वाढू लागली आहे.
राष्ट्रध्वज फडकवणे हाच जणू देशातील सर्वांत मोठा गुन्हा ठरला आहे. आणीबाणीच्या काळातही असे घडले नव्हते. त्यामुळे देशात आणीबाणी लादायची असेल, तर ती अधिकृतपणे लादा. – अभिजीत दिपके, ‘सीजेपी’चे संस्थापक




