अवघ्या १७ महिन्यांच्या आयरिशचा जागतिक विक्रमाला गवसणी!


रत्नागिरीच्या जलतरण तलावात १०० मीटर अंतर केले पूर्ण; तीन रेकॉर्ड बुकमध्ये नोंद


रत्नागिरी : वयाच्या अवघ्या १७व्या महिन्यात १०० मीटर जलतरणाचे अंतर पूर्ण करून चिमुकल्या आयरिश चक्रवर्ती याने रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. महेश मिलके स्विमिंग ग्रुपच्या मार्गदर्शनाखाली आयरिशने पाठीवर तरंगत जलतरणाची ही उल्लेखनीय कामगिरी केली. या कामगिरीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

रत्नागिरी येथील शासकीय जलतरण तलावात आयरिशने २५ बाय २१ मीटरच्या तलावात सलग चार फेऱ्या पूर्ण करत १०० मीटरचे अंतर १६ मिनिटे ४५ सेकंदांत पार केले. इतक्या कमी वयात त्याने साध्य केलेल्या या कामगिरीचे क्रीडा क्षेत्रातून कौतुक होत आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सकडूनही अधिकृत मान्यतेची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

आयरिशचे पालक दुबईहून भारतात परतल्यानंतर त्याच्या जलतरण सरावासाठी पुण्यात प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्याच्या कमी वयामुळे तेथे अडचणी आल्या. त्यानंतर महेश मिलके स्विमिंग ग्रुपच्या अनुभवावर विश्वास ठेवून पालकांनी रत्नागिरी गाठली. या ग्रुपमध्ये दाखल झाल्यानंतर अवघ्या पाच महिन्यांच्या प्रशिक्षणात आयरिशने ही कामगिरी साध्य केली.

मुख्य प्रशिक्षक महेश मिलके, गौरी मिलके, करण मिलके आणि तनया मिलके यांच्या मार्गदर्शनाखाली आयरिशला जलतरणाचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षकांचे नियोजन, तांत्रिक मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण सराव यामुळे त्याच्या या कामगिरीला हातभार लागला.

अवघ्या १७ महिन्यांच्या चिमुकल्याने मिळवलेले हे यश रत्नागिरीच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरले आहे. आयरिश चक्रवर्तीच्या या कामगिरीमुळे त्याचे पालक, प्रशिक्षक आणि महेश मिलके स्विमिंग ग्रुपचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button