भरणे नाक्यावर विद्यार्थिनींची छेडछाड; मद्यधुंद व्यक्तीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले


वर्दळीच्या बसथांब्यावर प्रकार; विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी पोलीस गस्त वाढविण्याची मागणी


खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे नाका परिसरातील बसथांब्यावर विद्यार्थिनींची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार २७ ऑगस्ट रोजी सकाळी घडला. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांच्या सतर्कतेमुळे संबंधित मद्यधुंद व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, २७ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ११ ते ११.३० वाजण्याच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील बसथांब्यावर काही विद्यार्थिनी एसटी बसची प्रतीक्षा करीत होत्या. यावेळी एका मद्यधुंद व्यक्तीने विद्यार्थिनींची छेडछाड केल्याचा आरोप आहे.

या प्रकारामुळे विद्यार्थिनींनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिक आणि काही तरुणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याच परिसरातील काही विद्यार्थिनींनी नागरिकांच्या मदतीने संबंधित व्यक्तीला पकडले. त्यानंतर त्याला थेट खेड पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

या घटनेप्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात पोलिसांकडून पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वर्दळीच्या आणि सार्वजनिक ठिकाणी विद्यार्थिनींसोबत असा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

भरणे नाका परिसरात विद्यार्थिनी, महिला, प्रवासी तसेच नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी या परिसरात नियमित पोलीस गस्त वाढवावी, सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करावी आणि विद्यार्थिनी व महिलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button