आगवे जोशीवाडीतून २५ वर्षीय तरुण बेपत्ता


लांजा : तालुक्यातील आगवे जोशीवाडी येथून २५ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात बेपत्ता नोंद करण्यात आली आहे. पंकज प्रकाश जोशी असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज जोशी हा दि. २७ जुलै रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आई प्रियांका प्रकाश जोशी यांना बाहेर जाऊन येतो, असे सांगून घरातून निघून गेला. मात्र, त्यानंतर तो घरी परतला नाही. आई व नातेवाईकांनी त्याचा परिसरात तसेच इतर नातेवाईकांकडे शोध घेतला; मात्र तो आढळून न आल्याने अखेर संजय विलास चव्हाण (रा. खालची कुंभारवाडी, लांजा) यांनी लांजा पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली.
बेपत्ता पंकज जोशी याची उंची अंदाजे ५ फूट असून चेहरा उभट, रंग सावळा, केस काळे व बारीक आणि नाक सरळ आहे. त्याने राखाडी रंगाचा फुलांच्या डिझाइनचा फुल शर्ट, निळ्या रंगाची ढोपरावर फाटलेली जीन्स पॅन्ट आणि काळ्या रंगाची चप्पल परिधान केली आहे. त्याच्या उजव्या पायाच्या ढोपराखाली जखमेची खूण असून डाव्या हातात पंचरंगी दोरा आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल जान्हवी मांजरे करीत आहेत.
पंकज जोशी यांच्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास त्यांनी तातडीने लांजा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button