खेडमध्ये गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या टेम्पोला वॅगनआरची जोरदार धडक; तिघे जखमी


भरणे नाक्यावर मध्यरात्री भीषण अपघात; महिला गंभीर, गणेशमूर्तींचे मोठे नुकसान


मुंबई-रत्नागिरी मार्गावरील भरणे नाका येथे गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या टेम्पोला वॅगनआर कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत वॅगनआरमधील एका पुरुषासह दोन महिला जखमी झाल्या असून, त्यातील एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. गंभीर जखमी महिलेला प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी अन्यत्र हलविण्यात आले.

भरणे नाका येथील वारकरी मठासमोर रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. एमएच ०५ एफव्ही ९३८३ क्रमांकाची वॅगनआर कार गोव्याच्या दिशेने जात असताना एमएच ०६ सीपी २०३९ क्रमांकाच्या गणेशमूर्ती वाहून नेणाऱ्या टेम्पोला पाठीमागून धडकली. धडक इतकी जोरदार होती की कारची दिशा बदलून ती मुंबईच्या दिशेने वळली. तर टेम्पो काही अंतर पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला थांबला.

हा टेम्पो पेन येथून गणेशमूर्ती घेऊन साखरपा परिसराच्या दिशेने जात होता. टेम्पोमध्ये गणेशोत्सवासाठी नेण्यात येणाऱ्या अनेक गणेशमूर्ती होत्या. अपघातात या मूर्तींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

वॅगनआरमधून रोहन बाळकृष्ण बाळसराफ, सोनल चव्हाण आणि कोमल शिर्के हे बदलापूर येथून गणपतीपुळेकडे जात होते. भरणे नाका येथे त्यांच्या कारची टेम्पोला धडक झाल्याने तिघेही जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गणेशोत्सवाच्या काही दिवस आधीच गणेशमूर्ती वाहून नेणाऱ्या वाहनाला झालेल्या या अपघातामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली. अपघाताची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button