
आ. भास्कर जाधव यांच्या प्रयत्नाने जिजाईच्या ५ नव्या गाड्या गुहागर आगाराच्या सेवेत
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ’जिजाई’ या नावाने सुरू केलेल्या नव्या एस्टी बसगाड्या आता गुहागरवासियांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. गुहागर आगाराला यापैकी पाच गाड्या प्राप्त झाल्याने ग्रामीण तसेच शहरातील प्रवाशांची मोठी गैरसोय दूर झाली आहे नव्या गाड्या सेवेत दाखल झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत असून, आमदार श्री. भास्करराव जाधव यांचे प्रवाशांनी आभार मानले आहेत.
गुहागर मतदार संघाचे आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी गुहागर आगारासाठी नवीन एस्टी बसगाड्यांची आवश्यकता लक्षात घेऊन राज्याचे परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांच्याकडे पत्राद्वारे १० नवीन गाड्यांची मागणी केली होती. या मागणीचा शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला त्यानुसार गुहागर आगाराला पहिल्या टप्प्यात पाच ’जिजाई’ बसगाड्या उपलब्ध झाल्या आहेत. गुहागर आगारातून विविध मार्गांवर मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. मात्र, उपलब्ध बसगाड्यांची संख्या आणि वाढती प्रवासी संख्या यामध्ये तफावत असल्याने अनेकदा प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. नवीन गाड्या सेवेत दाखल झाल्यामुळे ही समस्या मोठ्याप्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.



