दस्तुरी येथे क्षुल्लक कारणावरून वाद; दगडफेकीत एक जण किरकोळ जखमी

खेड : खेड-दापोली मार्गावरील दस्तुरी येथे वाहतूक कोंडी सोडवण्याच्या प्रयत्नादरम्यान स्थानिक ग्रामस्थ आणि टेम्पो ट्रॅव्हलर चालक यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला. या वादाचे पर्यवसान दगडफेकीत होऊन एक ग्रामस्थ किरकोळ जखमी झाला. ही घटना शनिवारी (ता. २३) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.
पुणे येथील काही पर्यटक दापोली येथून पर्यटन करून टेम्पो ट्रॅव्हलरने पुण्याकडे परतत होते. त्यांची गाडी दस्तुरी येथे आली असता खेड-दापोली मार्गाच्या सुरू असलेल्या कामामुळे रस्त्याची एक मार्गिका बंद असल्याने वाहतूक कोंडी झाली होती.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ प्रयत्न करत असताना टेम्पो ट्रॅव्हलर चालक आणि ग्रामस्थ यांच्यात क्षुल्लक कारणावरून शाब्दिक वाद झाला. काही वेळातच या वादाचे रूपांतर हाणामारीसदृश परिस्थितीत झाले.
वादादरम्यान एका ग्रामस्थाने टेम्पो ट्रॅव्हलरवर दगड मारल्याने वाहनाची काच फुटली. त्यानंतर चालकानेही दगड फेकल्याने तो दगड ग्रामस्थाच्या डोक्याला लागला. यात संबंधित ग्रामस्थ किरकोळ जखमी झाला.
या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र आल्याने दस्तुरी येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि वाहतूक कोंडी झाली. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी मध्यस्थी करून वाद मिटविल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
दरम्यान, या घटनेबाबत खेड पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही अधिकृत नोंद झालेली नसल्याने घटनेची अधिकृत माहिती तसेच पुढील कारवाईबाबत स्पष्टता मिळू शकलेली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button