
रत्नागिरी जिल्ह्यातील २३ हजार रेशन कार्डधारकांचे पत्ते कट
सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याबरोबरच अपात्र, मृत आणि दुबार लाभार्थ्यांना रेशनचा लाभ मिळू नये, यासाठी राज्य शासनाने हाती घेतलेल्या ’मिशन सुधार’ अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात मोठी कारवाई सुरू आहे. जिल्ह्यातील तब्बल ३७ हजार ४०० अपात्र, मृत आणि दुबार लाभार्थ्यांची नावे प्रशासनाच्या रडारवर आली असून, पडताळणीनंतर आतापर्यंत २३ हजार ३६६ नावे शिधापत्रिके तून वगळण्यात आली आहेत. उर्वरित १४ हजार ३४ संशयास्पद लाभार्थ्यांची पडताळणी सध्या सुरू आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गैरप्रकारांना आळा घालून शासनाकडून उपलब्ध होणारे धान्य केवळ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे, हा ’मिशन सुधार’ अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेत शिधापत्रिकेवरील लाभार्थ्यांची विविध निकषांवर तपासणी केली जात आहे. अपात्र ठरणार्या व्यक्तींची नावे रेशन कार्डमधून कमी करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील ३७ हजार ४०० संशयित लाभार्थ्यांच्या यादीपैकी २३ हजार ३६६ नावे पडताळणीनंतर रद्द करण्यात आली आहेत. मात्र, १४ हजार ३४ लाभार्थ्यांची तपासणी अद्याप सुरू आहे. या पडताळणीनंतर आणखी किती नावे शिधापत्रिकेतून वगळली जातील, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, पात्र असूनही चुकीच्या पद्धतीने शिधापत्रिकेतून नाव वगळण्यात आल्यास संबंधित नागरिकांना तक्रार निवारणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी तहसिल कार्यालयातील पुरवठा विभाग, सार्वजनिक सेवा केंद्र किंवा सेतू केंद्राशी संपर्क साधावा. तसेच १८००-२२-४९५० किंवा १९६७ या टोल-फ्री क्रमांकावर तक्रार अथवा अधिक माहितीसाठी संपर्क साधता येणार आहे.




