बुरोंडीच्या नव्या मासेमारी बंदराला गती! महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा

मंत्री नितेश राणे यांच्या बैठकीनंतर हालचाली वेगवान : कामाला लवकरच गती देण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन

दापोली : तालुक्यातील बुरोंडी येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या मासेमारी बंदराच्या कामाला गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. २२ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांचे कार्यकारी अधिकारी श्री. मेटकर यांनी बुरोंडी येथे भेट देऊन प्रस्तावित मासेमारी बंदराच्या ठिकाणाची पाहणी केली.

या महत्त्वपूर्ण प्रकल्पासंदर्भात यापूर्वी १८ मे रोजी मंत्रालयात बंदर मंत्री नितेश राणे यांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक पार पडली होती. या बैठकीत बुरोंडी येथील नव्या मासेमारी बंदरासंदर्भातील विविध बाबींवर चर्चा करण्यात आली होती. त्या बैठकीनंतर संबंधित विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी दौरा करण्यात आल्याने या प्रकल्पाच्या कामकाजाला आता प्रत्यक्ष गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
पाहणी दौऱ्यादरम्यान प्रस्तावित बंदराच्या ठिकाणाची पाहणी करून आवश्यक बाबींचा आढावा घेण्यात आला. या कामाला लवकरात लवकर गती देऊन ते पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन श्री. मेटकर यांनी दिल्याची माहिती आहे.
बुरोंडी हे दापोली तालुक्यातील महत्त्वाचे किनारी गाव असून, येथील मच्छीमार व मासेमारी व्यवसायावर अवलंबून असलेल्या नागरिकांसाठी प्रस्तावित मासेमारी बंदर अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. बंदर उभारणीमुळे स्थानिक मच्छीमारांना सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच मासेमारी व्यवसायाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

मंत्री नितेश राणे यांच्या मंत्रालयातील बैठकीनंतर महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांचा झालेला प्रत्यक्ष पाहणी दौरा हा प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. त्यामुळे बुरोंडी गावासह परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवीन मासेमारी बंदराचा प्रकल्प प्रत्यक्षात साकार झाल्यास मच्छीमार व्यवसाय, स्थानिक रोजगार आणि किनारी भागाच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळू शकते. आता प्रशासनाकडून पुढील कार्यवाही किती वेगाने होते आणि प्रकल्प प्रत्यक्ष कामाच्या टप्प्यात कधी प्रवेश करतो, याकडे बुरोंडीवासीयांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button