
मालगुंड येथे ‘श्रावणधारा मनामनातील’; कवितेतून बरसल्या श्रावणसरी
मालगुंड : कविश्रेष्ठ केशवसुतांच्या जन्मभूमीत त्यांच्या स्मारकाच्या साक्षीने कवितेच्या श्रावणधारा बरसल्या. कोकण मराठी साहित्य परिषद, मालगुंड शाखा आणि युवाशक्ती दक्षिण कोकण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्रावणधारा मनामनातील’ या साहित्यिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बालकवी, युवाकवी आणि ज्येष्ठ कवींच्या स्वरचित कवितांनी उपस्थित रसिकांना अक्षरशः चिंब भिजवून टाकले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कवी केशवसुतांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या साहित्यिक सोहळ्यास कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष आबा तथा गजानन पाटील, कोमसाप मालगुंड शाखाध्यक्षा नलिनी खेर, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका श्रद्धा कळंबटे, दक्षिण कोकण युवाशक्ती प्रमुख अरुण मोर्ये, शाखा सचिव विलास राणे, मालगुंड युवाशक्ती प्रमुख अमेय धोपटकर, डॉ. संतोष केळकर, शुभदा मुळ्ये, उज्ज्वला बापट, शिरीष लिंगायत, रमानंद लिमये, रविंद्र मेहंदळे, रोहिणी सावंत, स्मिता जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
बालकवींच्या स्वरचित कवितांनी वेधले लक्ष
विद्यार्थी गटातील बालकवींनी एकापेक्षा एक सरस स्वरचित कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. या स्पर्धेत यशिका विनायक भोसले (जि. प. शाळा निवेंडी भगवतीनगर) हिने प्रथम, सौमी सुशील भुते (जि. प. शाळा निवेंडी भगवतीनगर) हिने द्वितीय, तर अनुष्का मयुर पाटील (मालगुंड शाळा क्र. १) हिने तृतीय क्रमांक मिळवला. माऊली मंदार पात्ये (मालगुंड शाळा क्र. १) आणि तन्मय प्रशांत मांडवकर (जि. प. शाळा गणपतीपुळे) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
विजेत्यांसह सहभागी विद्यार्थ्यांना सन्मानपदक, सन्मानपत्र व सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
युवा गटात अमृता नवाथे, मालवी होरंबे, श्रुती फुटक आणि स्वरांनी गोरे यांनी आपल्या कवितांचे सादरीकरण केले. ज्येष्ठ कवी गटातून श्रद्धा कळंबटे, विलास राणे, रोहिणी सावंत आणि उज्ज्वला बापट यांनी कविता सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.
कवी अमेय धोपटकर यांच्या कवितांना गिरीश जोशी यांच्या हार्मोनियमची आणि हर्ष बोंडले यांच्या तबल्याची सुरेल साथ लाभली. काव्य, संगीत आणि श्रावणऋतूचा सुंदर संगम साधत या सादरीकरणाने रसिकांची विशेष दाद मिळवली. सहभागी कवींचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि लेखणी देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमेय धोपटकर व विलास राणे यांनी केले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोमसाप मालगुंड शाखेचे पदाधिकारी, कवी केशवसुत स्मारक समिती तसेच वाचनालयाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.




