
सौंदळ रेल्वेस्थानकावर सीएसएमटी-सावंतवाडी एक्सप्रेसला कायमस्वरूपी थांबा द्याग्रामपंचायतीचा सर्वानुमते ठराव; प्लॅटफॉर्म उभारण्याचीही मागणी
राजापूर : तालुक्यातील सौंदळ रेल्वेस्थानकाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासह नव्याने सुरू होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–सावंतवाडी रोड एक्सप्रेसला सौंदळ येथे कायमस्वरूपी थांबा देण्यात यावा, अशी मागणी ग्रुप ग्रामपंचायत सौंदळने केली आहे. याबाबत ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय मासिक सभेत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला आहे.
ग्रुप ग्रामपंचायत सौंदळच्या दि. २९ जुलै २०२६ रोजी झालेल्या प्रशासकीय मासिक सभेत विषय क्रमांक १४/२ अंतर्गत हा ठराव मांडण्यात आला. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सौंदळ रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म नसल्याने प्रवाशांना रेल्वेत चढताना तसेच उतरताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे येथे प्रवाशांच्या सोयीसाठी प्लॅटफॉर्मची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
सौंदळ रेल्वेस्थानकावर राजापूर तालुक्याच्या पूर्व भागातील सुमारे ७५ ते ८० गावांतील नागरिक अवलंबून आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील अणुस्कुरा परिसरातील काही गावांतील नागरिकही या स्थानकाचा वापर करतात. विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि महिला मोठ्या प्रमाणावर रत्नागिरीसह अन्य ठिकाणी जाण्यासाठी सौंदळ रेल्वेस्थानकावर अवलंबून आहेत.
सध्या सौंदळ स्थानकावर सावंतवाडी-दिवा गाडीव्यतिरिक्त अन्य गाड्यांना थांबा नसल्याने प्रवाशांना दूरच्या स्थानकांवर जावे लागते. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा अपव्यय होत असल्याचे ग्रामपंचायतीने ठरावात नमूद केले आहे.
नव्याने सुरू होणाऱ्या १५०८७-१५०८८ क्रमांकाच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–सावंतवाडी रोड एक्सप्रेसला सौंदळ रेल्वेस्थानकावर कायमस्वरूपी थांबा देण्यात यावा, अशी मागणीही ठरावाद्वारे करण्यात आली आहे. या गाडीला सौंदळ येथे थांबा मिळाल्यास विद्यार्थी, नोकरदार, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होईल. तसेच कोकणातील पर्यटन, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होईल. रेल्वेच्या प्रवासी संख्येतही वाढ होण्याची शक्यता ग्रामपंचायतीने व्यक्त केली आहे.
जनहिताचा विचार करून सौंदळ रेल्वेस्थानकावर नव्या एक्सप्रेसला कायमस्वरूपी थांबा देण्याबाबतचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. ठरावाच्या सूचक म्हणून सौ. श्रद्धा सुधीर भालेकर, तर अनुमोदक म्हणून सौ. सानिका दामोदर नारकर यांनी भूमिका बजावली.
सौंदळ रेल्वेस्थानकाला प्लॅटफॉर्म आणि नव्या एक्सप्रेसला कायमस्वरूपी थांबा मिळावा, यासाठी ग्रामपंचायतीच्या या ठरावामुळे स्थानिक नागरिकांच्या मागणीला अधिकृत पाठबळ मिळाले आहे.



