
नातूनगर रस्त्यावरील दरड दीड महिन्यानंतरही कायम;
गणेशोत्सवापूर्वी मार्ग सुरू करण्याची मागणी
खेड : तालुक्यातील नातूनगर रस्त्यावर तीन ठिकाणी दरड कोसळून दीड महिन्याचा कालावधी उलटला, तरीही रस्त्यावरील दरड हटवून मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आलेला नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
नातूनगरमार्गे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग शिवतर, जामगे, आंबेत तसेच चिंचाळीमार्गे पुढे दापोली, मंडणगड परिसराला जोडतो. त्यामुळे या परिसरातील नागरिकांसाठी हा महत्त्वाचा पर्यायी मार्ग आहे. रस्ता बंद असल्याने नागरिकांना सध्या खेडमार्गे वळसा घालून प्रवास करावा लागत आहे.
ग्रामस्थ सचिन उर्फ बबलू सकपाळ यांनी प्रशासनाचे लक्ष या समस्येकडे वेधले आहे. पावसाळा संपून जवळपास दीड महिना उलटला असूनही रस्त्यावर कोसळलेली दरड हटविण्यात आलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांकडेही विनंती करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
गणेशोत्सवासाठी मुंबईसह विविध शहरांतून मोठ्या संख्येने चाकरमानी गावाकडे येणार आहेत. या काळात वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता असून नातूनगर मार्ग सुरू झाल्यास नागरिकांचे सुमारे २० ते २५ किलोमीटर अंतर वाचू शकते. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाने तातडीने रस्त्यावरील दरड हटवून मार्ग पूर्ववत करावा. तसेच स्थानिक प्रशासनाला आवश्यक आदेश देऊन काम जलदगतीने पूर्ण करावे, अशी मागणी सचिन उर्फ बबलू सकपाळ यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.




