खाद्यतेलाच्या सुट्ट्या विक्रीवर पूर्णतः बंदी..

मुंबई २१: राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी केली
. सुट्या तेलाची विक्री करणाऱ्या घाऊक किंवा किरकोळ विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाणार असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना सात वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते; तसेच तीन लाखांपासून दहा लाख रुपयांपर्यंत दंडही ठोठावला जाऊ शकतो.
२०११ मध्ये ‘एफएसएसएआय’चा कायदा लागू झाला. त्यानुसार परवाना घेणे आणि नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. तपासणीदरम्यान १२ प्रमुख त्रुटी आढळल्या. अनेक खाद्यतेल उत्पादकांकडे परवाना किंवा नोंदणी नाही. खाद्यतेलात मोठ्या प्रमाणात भेसळ आढळली असून, ॲसिडिक घटक आणि औद्योगिक ट्रान्सफॅटही आढळले आहेत. तेलाचा खरा स्रोत; तसेच उत्पादन दिनांक लपविण्यात येतो. मुदत संपलेले तेल पुन्हा पॅक करून विकले जात असल्याचेही समोर आले आहे,’ असे तुकाराम मुंढे म्हणाले.
मुंढे यांच्या माहितीनुसार, अनेक ठिकाणी ॲगमार्कशिवाय तेलविक्री केली जाते. सुट्या स्वरूपात खाद्यतेल विकले जाते. फूड ग्रेड मटेरियल नसलेल्या वेष्टनाचा वापर केला जातो. घातक खनिज तेलाची वाहतूक झालेल्या टँकरमधूनच खाद्यतेलाची वाहतूक करण्यात येते; तसेच गंजलेल्या कॅनमध्ये तेलाचे पुन्हा पॅकिंग केले जाते. सन २०२५-२६ मध्ये एक हजार २४७ खाद्यतेल नमुने तपासण्यात आले. त्यापैकी एक हजार १४२ नमुने प्रमाणित आढळले, ७७ नमुने निकृष्ट दर्जाचे आढळले; तसेच १३ नमुने असुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे खाद्यतेलाबाबत विशेष आदेश काढण्यात आल्याचे मुंढे म्हणाले.

 आदेशाची अधिकृत प्रत किंवा पीडीएफ (PDF Document) थेट डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला Maharashtra FDA Official Website भेट देऊन 'Circulars / Orders' विभागात ती पाहू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button