
आंबा घाटात सापडलेली १४ हजारांची बॅग मालकाला केली परत, पोलिसांनी जपली माणुसकी
रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाट परिसरात पेट्रोलिंग करताना महामार्ग पोलिसांना बेवारस अवस्थेत आढळलेली बॅग शोधून तिच्या मालकाचा संपर्क साधत रोख रकमेसह सर्व साहित्य सुरक्षितपणे परत करण्यात आले. पोलिसांच्या या प्रामाणिकपणा आणि कर्तव्यदक्षतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
महामार्ग पोलीस पथक हातखंबाचे पोकॉ. खामकर, पोकॉ. जाधवर, पोकॉ. शिंगाडे आणि चापोकॉ. दाभाडे हे आंबा घाट परिसरात नियमित पेट्रोलिंग करत असताना महामार्गाच्या कडेला त्यांना एक बेवारस बॅग आढळून आली. पोलिसांनी बॅगेची पाहणी केली असता त्यामध्ये विविध कागदपत्रे, १४ हजार ३०० रुपयांची रोख रक्कम, कपडे तसेच अन्य साहित्य आढळून आले. बॅगेतील कागदपत्रे आणि इतर वस्तूंच्या आधारे ही बॅग आकाश दयानंद भोई (वय २२, रा. खांदे गल्ली, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) यांची असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला. आकाश भोई हे कोल्हापूरच्या दिशेने प्रवास करत असल्याचे समजल्यानंतर त्यांना परत बोलावून त्यांची ओळख आणि बॅग त्यांच्या मालकीची असल्याची खात्री करण्यात आली.




