मगरीच्या तावडीतून आईची सुटका करणाऱ्या शूर स्वर्णीचा जर्नालिस्ट असोसिएशनतर्फे सत्कार

चिपळूण : वालोपे गणेशवाडी येथे नदीकिनारी मगरीच्या हल्ल्यात अडकलेल्या आईची धाडसाने सुटका करणाऱ्या १० वर्षीय स्वर्णी भूपेंद्र पवार हिचा जर्नालिस्ट असोसिएशन चिपळूणतर्फे तिच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला. स्वर्णीच्या धाडसाचे कौतुक करत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तिला भेटवस्तू आणि रोख बक्षीस देऊन गौरविले.

गुरुवारी, २० ऑगस्ट रोजी सायंकाळी स्वर्णीची आई नंदिनी पवार (३५) या वालोपे नदीकिनारी गणेश घाटावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी दबा धरून बसलेल्या मगरीने त्यांचा पाय पकडून त्यांना पाण्यात ओढण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने नंदिनी यांनी आरडाओरड करत बचावासाठी प्रयत्न सुरू केले.

नंदिनी यांनी एका हाताने दगडाचा आधार घेतला असताना मगर त्यांना पाण्याकडे खेचत होती. हा प्रकार पाहून त्यांच्यासोबत असलेल्या स्वर्णीने प्रसंगावधान राखत आईचा हात पकडला आणि तिला बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. नंदिनी यांनीही मगरीपासून सुटण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि नंदिनी यांची मगरीच्या तावडीतून सुटका झाली.

या प्रसंगात स्वर्णीने दाखवलेल्या धाडसाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. तिच्या या शौर्याची दखल घेत जर्नालिस्ट असोसिएशन चिपळूणचे अध्यक्ष तथा दैनिक सागरचे पत्रकार सुनील साळवी, कार्याध्यक्ष सतीश कदम, उपाध्यक्ष गजेंद्र खडपे, खजिनदार संतोष पिलके आणि सदस्य ललेश कदम यांनी स्वर्णीच्या घरी जाऊन तिचा सत्कार केला.

यावेळी स्वर्णीला भेटवस्तू आणि रोख बक्षीस देण्यात आले. स्वर्णीने प्रसंग कसा घडला आणि त्या वेळी आईला वाचवण्यासाठी तिने काय केले, याचा अनुभव उपस्थितांना सांगितला. तिच्या धाडसाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

आईच्या संकटसमयी प्रसंगावधान आणि धैर्य दाखवणाऱ्या स्वर्णीच्या या धाडसाने परिसरात तिच्या शौर्याची चर्चा होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button