
मगरीने आईला पाण्यात ओढले; १० वर्षांच्या लेकीने दाखवले अद्भुत धाडस!
वालोपेत वाशिष्ठी नदीकाठी थरार; स्वर्णीच्या प्रसंगावधानामुळे आईचा जीव वाचला
चिपळूण तालुक्यातील वालोपे-गणेशवाडी येथे वाशिष्ठी नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेलेल्या नंदिनी पवार (३५) यांच्यावर मगरीने अचानक हल्ला केल्याची थरारक घटना घडली. मगरीने नंदिनी पवार यांना पाण्यात ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी सोबत असलेल्या त्यांच्या अवघ्या दहा वर्षांच्या मुलीने प्रसंगावधान राखत आईचा हात घट्ट पकडला आणि तिला नदीकाठावर खेचून आणले.
स्वर्णीच्या या धाडसी प्रयत्नामुळे नंदिनी पवार यांचा जीव वाचला. मात्र, मगरीच्या हल्ल्यात त्या जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी कामथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली.
मगरींच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीती
पावसाळ्यात वाशिष्ठी नदी परिसरात मगरींचा वावर वाढत असल्याने नदीकाठी जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः नदीत पोहणे, कपडे किंवा जनावरे धुण्यासाठी नदीपात्रात जाणे टाळावे, तसेच लहान मुलांना नदीकाठी नेऊ नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
अवघ्या दहा वर्षांच्या स्वर्णीने दाखवलेल्या धाडसामुळे आज तिच्या आईला जीवदान मिळाले असून, तिच्या प्रसंगावधानाचे परिसरातून कौतुक होत आहे.




