
खेडच्या मानवी वस्तीत प्रथमच ‘बांबू पिट वायपर’चा थरार; विषारी ‘चापडा’ सर्पाचे सुरक्षित रेस्क्यू
खेड शहरातील महात्मा फुले नगर परिसरात मानवी वस्तीत प्रथमच ‘बांबू पिट वायपर’ अर्थात ‘चापडा’ जातीचा विषारी साप आढळून आल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. रहिवाशांच्या निदर्शनास साप आल्यानंतर त्यांनी तत्काळ स्थानिक वन्यजीव रक्षकांशी संपर्क साधला.
माहिती मिळताच वन्यजीव रक्षक सर्वेश पवार, रोहन खेडेकर, ओमकार चिखले तसेच नगरसेवक यश खेडेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सापाला कोणतीही इजा न करता सुरक्षितरीत्या रेस्क्यू केले. त्यानंतर त्याला योग्य ठिकाणी नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
घनदाट जंगल, झुडपे आणि ओलसर भाग पसंतीचा
‘बांबू पिट वायपर’ हा प्रामुख्याने घनदाट जंगल, बांबूची बेटे, झुडपे, वेली तसेच ओलसर भागात आढळतो. झाडाझुडपांवर आणि वेलींवर राहण्याची त्याची प्रवृत्ती असून तो प्रामुख्याने निशाचर असतो. सामान्यतः हा साप शांत असला तरी धोका जाणवल्यास किंवा अचानक स्पर्श झाल्यास बचावासाठी दंश करू शकतो.
या सापाचे विष हेमोटॉक्सिक स्वरूपाचे असल्याने दंश झाल्यास रक्त गोठण्याच्या प्रक्रियेवर तसेच शरीरातील ऊतींवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा विषारी सापाचा सामना झाल्यास नागरिकांनी त्याला पकडण्याचा किंवा हाताळण्याचा प्रयत्न करू नये.
साप दिसल्यास तज्ज्ञांशी संपर्काचे आवाहन
खेड शहरातील मानवी वस्तीत या दुर्मिळ विषारी सापाचा आढळ झाल्याने सर्पमित्रांमध्येही आश्चर्य व्यक्त होत आहे. नागरिकांनी साप दिसल्यास घाबरून न जाता सुरक्षित अंतर राखावे, त्याला त्रास देऊ नये आणि तातडीने प्रशिक्षित सर्पमित्र अथवा वन्यजीव रक्षकांची मदत घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.




