पत्रकार मकरंद भागवत यांना राज्यस्तरीय ‘स्व. नानासाहेब जोशी स्मृती पुरस्कार’ जाहीर

चिपळूण : ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या पत्रकारांच्या राष्ट्रीय संघटनेतर्फे देण्यात येणारा यंदाचा राज्यस्तरीय ‘स्व. नानासाहेब जोशी स्मृती पुरस्कार’ चिपळूण येथील ज्येष्ठ पत्रकार मकरंद भागवत यांना जाहीर झाला आहे. मुंबईतील ग्रॅण्ट रोड येथे २० ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील पत्रकारांचा दरवर्षी राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. दैनिक सागरचे संस्थापक संपादक आणि ‘कोकणचे बुद्धिवैभव’ म्हणून ओळखले जाणारे स्व. निशिकांत तथा नानासाहेब जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार प्रदान केला जातो. यंदा या पुरस्काराचे तिसरे वर्ष असून, आपल्या सडेतोड लेखणीने पत्रकारितेत वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या मकरंद भागवत यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

भागवत यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात दैनिक सागरमधून केली. गेल्या तीन दशकांच्या पत्रकारितेच्या प्रवासात त्यांनी विविध दैनिकांमध्ये उपसंपादक म्हणून काम केले आहे. तसेच स्वमालकीच्या साप्ताहिक आणि मासिकाचे संपादनही त्यांनी यशस्वीपणे केले. सध्या ते डिजिटल माध्यमातून पत्रकारितेत सक्रिय असून, सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर परखड लिखाण करत आहेत.

या पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलचे संस्थापक अध्यक्ष यासिन पटेल, प्रदेशाध्यक्ष अॅड. विठ्ठल मोघे, केंद्रीय सचिव अतुल होनकळसे, प्रमुख विश्वस्त गणेश कोळी आदींनी मकरंद भागवत यांचे अभिनंदन केले. रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रातूनही त्यांच्या निवडीचे कौतुक होत आहे.

दरम्यान, पुरस्काराबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना मकरंद भागवत म्हणाले, “तीस वर्षांपूर्वी ज्यांच्या हाताखाली पत्रकारितेचा श्रीगणेशा केला, त्याच नानांच्या नावाचा पुरस्कार जाहीर झाल्याचा मनस्वी आनंद आहे.”

मुंबई येथे २० ऑगस्ट रोजी होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात भागवत यांच्यासह राज्यातील अन्य पत्रकारांनाही विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button