कोल्हापूर खंडपीठासाठी लवकरच ४९५ पदांची भरती!

Kolhapur Bench Recruitment : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे लवकरच खंडपीठात रूपांतर होईल. खंडपीठासाठी ४९५ कायमस्वरूपी पदांची भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी दिली.

शिवाजी विद्यापीठातील राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात रविवारी सकाळी कोल्हापूर सर्किट बेंच वर्षपूर्ती सोहळ्यानिमीत्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरन्यायाधीश भूषण गवई होते. यावेळी न्यायमूर्ती शिवकुमार दिगे, न्यायमूर्ती एस. जी. चपळगांवकर, न्यायमूर्ती अजित कडेठाणकर, न्यायमूर्ती वृषाली जोशी, न्यायमूर्ती माधव जामदार यांच्यासह महाधिवक्ता मिलिंद साठ्ये, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिलसिंग, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू महाराज, महापौर रुपाराणी निकम उपस्थित होते.

न्यायमूर्ती घुगे म्हणाले, माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी कोल्हापूर सर्किट बेंचचा ठाम निर्णय घेतला. एक महिन्यात काम पूर्ण करून तो निर्णय पूर्णत्वास नेण्याचे काम न्यायमूर्ती अलोक आराध्ये यांनी केले. या दोघांमुळेच सर्किट बेंच स्थापन झाले. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक म्हणाले, सरकार व न्यायव्यवस्था यांनी एखादा निर्णय पूर्ण करण्याचे ठरवले तर काय होऊ शकते याचे उदाहरण म्हणजे कोल्हापूर सर्किट बेंच आहे. एक महिन्यात ४० वर्षांच्या लढ्याला अखेर पूर्णविराम मिळाल्याचे त्यांनी सांगितले. न्यायमूर्ती शर्मिला देशमुख म्हणाल्या, कोल्हापूरला १४७ वर्षांची न्यायदानाची उज्ज्वल परंपरा आहे. न्याय मिळणे प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून कोल्हापूर सर्किट बेंचमुळे पक्षकारांना हा अधिकार मिळाला आहे. आता लवकरच सर्किट बेंचचे रूपांतर खंडपीठात होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र गोवा बार कौन्सिल सदस्य ॲड. विवेक घाटगे यांनी रेंज व सर्व्हरडाऊनमुळे ई फायलिंगमध्ये अडथळे निर्माण होत असून याचा विचार करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र मंडलिक यांनी स्वागत तर बार कौन्सिल सदस्य संग्राम देसाई यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button