
पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या वीज वितरणाच्या क्षेत्रात ‘वायरवूमन’ ज्योती बनली धामणगावची वीजदूत!
पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या वीज वितरणाच्या क्षेत्रात आपल्या कामातून वेगळी ओळख निर्माण करणारी बुलढाणा जिल्ह्यातील धामणगावची ज्योती आहेर सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे. गेल्या चार वर्षांपासून महावितरणमध्ये कार्यरत असलेल्या ज्योती गावातील वीजपुरवठ्याशी संबंधित तक्रारी तत्परतेने सोडवत असून, गावकऱ्यांसाठी त्या आता केवळ कर्मचारी राहिलेल्या नाहीत, तर आपल्या घरचीच लेक बनल्या आहेत.
कंबरेला प्लायर, खांद्यावर सुरक्षा बेल्ट, हातात आवश्यक साहित्य आणि पोलवर चढण्यासाठीचे बूट असा ज्योतींचा वेश धामणगावच्या नागरिकांसाठी आता परिचित झाला आहे. गावात वीज गेली, लाईनमध्ये बिघाड झाला किंवा तांत्रिक समस्या निर्माण झाली की अनेक नागरिक थेट ज्योती यांच्याशी संपर्क साधतात.
वीज गेली की ज्योतींच्या फोनची घंटी वाजते
धामणगाव सेक्शनमध्ये काम करताना ज्योती यांना ड्युटीची ठरावीक वेळ नाही. दिवस असो वा रात्र, तक्रार आली की त्या घटनास्थळी पोहोचतात. शेतातील वीजवाहिनी असो, डीपीचा बिघाड असो किंवा तुटलेली लाईन असो, सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करत त्या काम पूर्ण करतात.
पोलवर चढण्यापूर्वी संबंधित लाईनचा वीजपुरवठा बंद असल्याची खात्री केली जाते. त्यानंतर सुरक्षा साधने वापरून दुरुस्ती केली जाते आणि काम पूर्ण झाल्यानंतर कार्यालयाशी संपर्क साधून वीजपुरवठा पुन्हा सुरू केला जातो.
पहिल्यांदा पोल चढताना वाटली होती भीती
आज पोलवर सहज चढणाऱ्या ज्योती यांना सुरुवातीला मात्र भीती वाटत होती. प्रशिक्षणाच्या काळात प्रथमच पोलवर चढण्याची वेळ आली तेव्हा त्या घाबरल्या होत्या. मात्र नियमित सरावामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला. आठ दिवसांच्या सरावानंतर पोल चढणे त्यांच्या कामाचा सहज भाग बनले.
त्यांच्या कामातील प्लायरला त्या विशेष महत्त्व देतात. सुरक्षेचा बेल्ट, हातमोजे, बूट, अर्थिंग रॉड आणि इतर साधने घेऊनच त्या फिल्डवर उतरतात.
धोकादायक प्रसंगांचाही सामना
वीज दुरुस्तीचे काम करताना अनेकदा धोकादायक प्रसंगांना सामोरे जावे लागते. एका वेळी संपूर्ण गावाचा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर डीपीचा फ्यूज दुरुस्त करताना मोठा स्पार्क झाला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे उपस्थित नागरिक घाबरले. मात्र परिस्थितीवर नियंत्रण मिळवत ज्योती यांनी काम पूर्ण केले.
पोलीस किंवा सैन्यात जाण्याचं होतं स्वप्न
ज्योती यांना लहानपणापासून वर्दीचे आकर्षण होते. पोलीस किंवा सैन्यात भरती होण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र उंचीच्या निकषामुळे ते स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. त्यानंतर महावितरणच्या भरतीत त्यांची निवड झाली आणि वर्दी परिधान करण्याची त्यांची इच्छा एका वेगळ्या रूपात पूर्ण झाली.
ज्योती या त्यांच्या कुटुंबातील पहिल्या सरकारी कर्मचारी आहेत. त्यांच्या वडिलांनी चारही मुलांना समान संधी देत शिक्षण आणि करिअरसाठी प्रोत्साहन दिले.
‘काम तेच, मग नाव काहीही असो!’
ज्योती यांच्या कामाबद्दल त्यांचे वरिष्ठही कौतुकाने बोलतात. फिल्डवरील काम शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक असले तरी ज्योती यांनी ते आत्मविश्वासाने स्वीकारले आहे. त्यांच्या कामामुळे महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत झाली असल्याचे सहकाऱ्यांचे म्हणणे आहे.
‘वायरमन’ की ‘वायरवूमन’ असा प्रश्न विचारल्यावर ज्योती यांचे उत्तरही तितकेच साधे आहे—“वायरवूमन म्हटलं काय, वायरमन म्हटलं काय… काम तर एकच करणार ना?”
धामणगावच्या शेतातून अर्थिंग रॉड हातात घेऊन, कंबरेला प्लायर अडकवून आत्मविश्वासाने चालणाऱ्या ज्योती आहेर यांची ही वाटचाल केवळ एका महिलेच्या कर्तृत्वाची कहाणी नाही, तर ‘ नव्या बदलाची प्रेरणादायी कहाणी आहे.
लोकांच्या घरातील अंधार दूर करून पुन्हा प्रकाश देण्यातच समाधान मानणाऱ्या ज्योती यांच्यासाठी ही नोकरी केवळ रोजगार नसून समाजसेवेचे माध्यम बनली आहे. म्हणूनच धामणगावात वीज गेली की नागरिकांच्या ओठांवर सर्वप्रथम एकच नाव येते—ज्योती!




