
…तब्बल 355 बालमूर्तीकारांच्या बालहातांनी एकाचवेळी साकारले गणपती बाप्पा!

- ईशान नेवरेकर ठरला प्रथम क्रमांकाचा मानकरी
- “कांचन डिजिटल” आणि “रत्नागिरी नगर परिषद” यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन
- जिल्ह्यातील विशेष उल्लेखनीय ठरली स्पर्धा रत्नागिरी : रत्नागिरीतील प्रसिद्ध “कांचन डिजिटल”तर्फे घरगुती गणपती सजावट स्पर्धांतर्गत बालकलाकारांच्या हस्तकौशल्याला वाव देण्यासाठी “गणपती साकारणे स्पर्धा” आयोजित करण्यात आलेली. या स्पर्धेला शालेय विद्यार्थ्यांचा प्रचंड उत्स्फूर्त सहभाग लाभला. तब्बल 355 बालकलाकारांच्या बालहातांनी अप्रतिम गणपती बाप्पा साकारले. इतक्या प्रचंड संख्येने बालकलाकार एकाचवेळी गणपती बाप्पाची मूर्ती साकारताना पाहण्याचा हा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक ईशान साईनाथ नेवरेकर ( पटवर्धन हायस्कूल ) याने पटकावला. जिल्ह्यातील अशी ही पहिलीच अनोखी स्पर्धा ठरली आहे. बालकलाकारांसाठी ही अनोखी स्पर्धा आयोजित केल्याबद्दल आयोजक कांचन मालगुंडकर यांचे विशेष कौतुक केले जात आहे. “कांचन डिजिटल” आणि “रत्नागिरी नगर परिषद” यांच्या संयुक्त विद्यमाने ही अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

आज 16 ऑगस्ट रोजी जयेश मंगल पार्क-थिबा पॅलेस रोड येथे आयोजित स्पर्धेला, स्पर्धा सुरू असताना अनेक विद्यार्थ्यांनी आम्हाला पण सहभागी करून घेण्याची आग्रहाची विनंती केली. त्यांना कांचन मालगुंडकर यांनी मोठ्या मनाने आयत्यावेळी समाविष्ट करून घेतले. विशेष म्हणजे यंदा विद्यार्थ्यांसोबत आलेल्या पालकांनाही यावेळी गणपती साकारण्याची संधी देण्यात आली.
गतवर्षी पासून या स्पर्धेला सुरुवात झाली. यंदा दुसरे वर्ष असूनही शालेय विद्यार्थ्यांचा मिळालेला लक्षणीय प्रतिसाद हा विशेष उल्लेखनीय ठरला.
प्रारंभी या स्पर्धेचे उद्घाटन रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे यांचे हस्ते आणि नगरसेविका, महिला, बालकल्याण समिती सभापती सौ.प्रिती सुर्वे, नगरसेवक निमेश नायर, नगरसेवक संजय हळदणकर, नगरसेविका सौ. पूजा पवार, सौ. नाहीदा सोलकर, सौ.वैभवी खेडेकर, सौ.सुप्रिया रसाळ, सौ.पिलणकर, सौ.कळंबटे सौ. रूकसार खान, सौ. पाटील, सौ. आफरीन होडेकर, नगरसेवक सौरभ मलुष्टे, तसेच उद्योजक प्रसन्न आंबुलकर, देवम जैन, विकी जैन यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या स्पर्धेला रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. काही शाळेतील कलाशिक्षकही या स्पर्धेला उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.
यावेळी कांचन मालगुंडकर यांनी या स्पर्धेचा उद्देश सांगून रत्नागिरी नगर परिषदेने सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. यावेळी नगरसेवक निमेश नायर यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या, नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे यांनी या स्पर्धेला जो उदंड प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल कांचन मालगुंडकर यांचे कौतुक करून भविष्यात कांचन डिजिटल यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला रत्नागिरी नगर परिषदेचे संपूर्ण सहकार्य लागेल, असे अभिवचन दिले.
सर्व स्पर्धकांना रत्नागिरी नगर परिषदेच्या वतीने भेटवस्तू देण्यात आले. रत्नागिरीमधील प्रसिद्ध मूर्तिकार ओंकार पाटणकर यांनी विद्यार्थ्यांसमोर आपल्या हस्तकौशल्याने सुबक गणपती मूर्ती तयार केली आणि मूर्ती घडविण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या हातातला मोबाईल काही वेळ बाजूला ठेवून त्यांच्या हातात माती देण्याचे मौलीक काम कांचन मालगुंडकर यांनी केले.
या स्पर्धेला मुकेश गुंदेचा, नरेंद्र पाटील, अभिजित नांदगावकर, विजय पाडावे, विजय बासुतकर, निलेश जगताप, बाळकृष्ण चव्हाण, शकील गवाणकर, तन्मय दाते, अजिंक्य सनगरे, मंथन मालगुंडकर, श्रावणी मालगुंडकर सौ. दिपीका कुबल यांचे सहकार्य लाभले.
विजेत्यांची नावे
या स्पर्धेत प्रथम क्रमांक ईशान साईनाथ नेवरेकर ( पटवर्धन हायस्कूल ) याने पटकावला. तर या स्पर्धेत द्वितीय क्रमांक रूद्र राजेंद्र गुरव ( जी जी पी एस गुरुकुल ), तृतीय क्रमांक ओम तोडणकर ( पटवर्धन हायस्कूल ) यांनी पटकावला. या स्पर्धेत तब्बल 12 विद्यार्थ्यांना उत्तैजनार्थ पारितोषिके देण्यात आली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू, आकर्षक शील्ड देण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू आणि सहभागी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.




