
उद्योग न करणाऱ्यांचे एमआयडीसी भूखंड रद्द करा; उदय सामंत यांचे निर्देश
मुंबई : एमआयडीसीची जमीन केवळ उद्योग उभारणीसाठीच असून, तिचा कोणताही गैरवापर खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला. उद्योगासाठी भूखंड घेऊनही प्रत्यक्षात उद्योग सुरू न करणाऱ्या व्यावसायिकांचे भूखंड तातडीने रद्द करून ते नवीन व इच्छुक उद्योजकांना उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
राज्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी उपलब्ध असलेल्या एमआयडीसीच्या भूखंडांचा प्रभावी वापर होणे आवश्यक आहे. अनेक व्यावसायिकांनी उद्योग उभारणीसाठी भूखंड घेतले आहेत; मात्र त्यावर अद्याप उद्योग सुरू केलेले नाहीत. त्यामुळे अशा भूखंडांचा आढावा घेऊन नियमांचे पालन न करणाऱ्या भूखंडधारकांवर कारवाई करण्याची भूमिका उद्योग विभागाने घेतली आहे.
उद्योगासाठी जमीन, उद्योगालाच वापर
एमआयडीसीच्या भूखंडांचा वापर उद्योग उभारणीसाठीच झाला पाहिजे. भूखंड घेऊन दीर्घकाळ उद्योग सुरू न करणाऱ्यांमुळे नवीन उद्योजकांना संधी मिळत नाही. त्यामुळे निष्क्रिय भूखंड तातडीने ताब्यात घेऊन उद्योग सुरू करण्यास इच्छुक असलेल्या नवीन उद्योजकांना उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया राबवावी, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे एमआयडीसीतील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या भूखंडांचा प्रश्न मार्गी लागण्यासह नवीन उद्योगांना जागा उपलब्ध होऊन रोजगारनिर्मितीलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.




