आंबवली देउळवाडी परिसरात बिबट्याचा वावर; सीसीटीव्हीत कैद झाल्याने नागरिकांमध्ये भीती

खेड : तालुक्यातील आंबवली देवळवाडी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. देवळवाडीतील एका घराच्या परिसरात मध्यरात्री बिबट्या फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. १२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे.
देऊळवाडीतील एका घराच्या परिसरात बिबट्या फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. मध्यरात्रीच्या वेळी मानवी वस्तीच्या अगदी जवळ बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्या नेमका कोणत्या दिशेने आला आणि त्यानंतर कोणत्या दिशेने गेला, याबाबत परिसरात चर्चा सुरू आहे.
आंबवली देउळवाडी परिसरात यापूर्वीही बिबट्याच्या वावराच्या घटना घडल्या असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना तसेच पाळीव प्राणी किंवा गुरे बाहेर बांधताना नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याचा वावर कैद झाल्याने या घटनेची परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाने परिसराची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकट्याने घराबाहेर पडणे टाळावे, लहान मुले व पाळीव प्राण्यांकडे विशेष लक्ष द्यावे तसेच बिबट्या आढळल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. बिबट्याचा वावर मानवी वस्तीजवळ आढळल्याने वनविभागाने तातडीने दखल घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button