
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील १२ अधिकारी व अंमलदारांना ‘अति उत्कृष्ट’ व ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर
रत्नागिरी : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र पोलीस दलातील दीर्घकालीन व निष्कलंक उत्कृष्ट सेवेची दखल घेऊन, भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील १२ पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना प्रतिष्ठित पदके जाहीर झाली आहेत. यामध्ये ८ जणांना ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’ तर ४ जणांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर झाले असून, उद्या (१५ ऑगस्ट) होणाऱ्या मुख्य सोहळ्यात त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
अति उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त अधिकारी व अंमलदारांमध्ये लांजा पोलीस ठाण्याचे निरीक्षक नीलकंठ बगळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन दत्तात्रय ढेरे, पोलीस मुख्यालयाचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक काशीनाथ महादेव गुरव, लांजा पोलीस ठाण्याचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय शिवाजी साळवी, जिल्हा विशेष शाखेच्या महिला पोलीस हवालदार निशा दीपक केळकर, पोलीस मुख्यालयाच्या महिला पोलीस हवालदार वैदेही विनोद कदम, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस हवालदार महेश दगडू गुरव, लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार आशिष वसंत शेलार यांचा समावेश आहे. तसेच उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त अधिकारी व अंमलदार यांच्यामध्ये राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित आनंदराव यादव, चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद भगवानराव मेंगडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार विजय तानाजी आंबेकर आणि जिल्हा विशेष शाखेचे पोलीस हवालदार अमोल अरुण गमरे यांचा समावेश आहे.
या सर्व अधिकारी व अंमलदारांनी आपल्या कर्तव्यकाळात बजावलेल्या उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या या यशाबद्दल पोलीस दलातून कौतुक होत आहे.




