
मासेमारीचा नवा हंगाम समाधानकारक
दोन महिन्यांच्या मासेमारी बंदीनंतर सुरू झालेल्या नव्या मासेमारी हंगामाचा पहिला आठवडा रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांसाठी समाधानकारक ठरला आहे. समुद्रात उतरलेल्या मोजक्या नौकांच्या जाळ्यात बांगडा, फिशमिलची बांगडी, कोळंबी तसेच काही प्रमाणात सुरमई मिळू लागली आहे. विशेषतः बांगड्याचे प्रमाण चांगले असल्याने सुरुवातीलाच मच्छीमारांना दिलासा मिळाला आहे. सध्या एका नौकेला साधारण ५० ते १०० डिशपर्यंत मासळी मिळत असून, एका डिशमध्ये ३२ किलो मासा असतो. त्यामुळे मासेमारी हंगामाची सुरुवात चांगली झाल्याचे चित्र आहे.
दरवर्षी पावसाळ्यात मत्स्य प्रजननाचा कालावधी लक्षात घेऊन समुद्रातील मासेमारीवर दोन महिन्यांची बंदी घालण्यात येते. या चंदीचा कालावधी संपल्यानंतर मच्छीमार नव्या हंगामाच्या प्रतीक्षेत असतात. यंदाही बंदी उठल्यानंतर जिल्ह्यातील काही नौका मासेमारीसाठी समुद्रात उतरल्या. मात्र, सर्वच मच्छीमारांनी अद्याप समुद्रात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे किनारपट्टीवरून समुद्रात जाणार्या नौकांची संख्या सध्या अत्यल्प आहे.



