मुंबईत उच्चभ्रू इमारतीला भीषण आग; अडीच वर्षांच्या चिमुरड्यासह तरुणीचा मृत्यू, ४ जण जखमी!


मुंबईतील विलेपार्ले (पश्चिम) येथील बॅप्टिस्टा रोडवरील एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत २३ वर्षीय महिला आणि अडीच वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला असून अन्य चार जण जखमी झाले आहेत.

काल (११ ऑगस्ट) रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, अंकिता आणि अडीच वर्षांचा अबीर अशी मृतांची नावे आहेत. तर पार्थ (३२), हिरेन (६४), यशस्वी आणि अभिषेक अशी चार जखमींची नावे आहेत.

मुंबई अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, एका तळमजला अधिक १२ मजली इमारतीच्या ११ व्या मजल्यावर रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आगीची तीव्रता वाढल्याने या आगीला ‘लेव्हल २’ (दुसऱ्या श्रेणीची आग) म्हणून घोषित करण्यात आलं. अग्निशामक दलाच्या अधिकार्‍यांनी सांगितलं की, आग लागल्यानंतर ११ व्या मजल्यावर अनेक रहिवासी अडकले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी त्यांना सुखरूप बाहेर काढलं आणि त्यांचं स्थलांतर केलं.

“रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान सर्व सहा जण एकामागून एक जखमी झाले आणि बचाव कार्यादरम्यान दोन व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या”, असं एका अग्निशामक अधिकाऱ्याने सांगितलं. बचाव कार्यानंतर जखमींना वांद्रे येथील नानावटी रुग्णालयात नेण्यात आलं, तिथे दोघांना मृत घोषित करण्यात आलं. उर्वरित चार जणांवर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मध्यरात्रीच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात आली, त्यानंतर कुलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. “संपूर्ण कॉरिडॉर आणि इमारतीमध्ये धूर पसरल्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत होत्या”, असं अधिकाऱ्याने सांगितलं. आगीचं नेमके कारण अद्याप समजू शकलेलं नसून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button