
अवैध दारू, अमली पदार्थांविरोधात प्रविण जाधव यांचे १५ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण
चिपळूण : चिपळूण तालुक्यात अवैध दारू, गांजा तसेच अन्य अमली पदार्थांची विक्री वाढत असल्याचा आरोप करत शिरळ येथील सामाजिक कार्यकर्ते प्रविण राजाराम जाधव यांनी १५ ऑगस्टपासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले आहे.
तालुक्यात अवैध दारू व अमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असून, त्याचा परिणाम युवकांसह अल्पवयीन मुलांवर होत असल्याचे जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे. वाढत्या व्यसनाधीनतेमुळे अनेक कुटुंबांवर गंभीर परिणाम होत असून, समाजाच्या भवितव्याच्या दृष्टीने ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या अवैध धंद्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
यापूर्वी २८ जून २०२६ रोजी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा उत्पादन शुल्क विभाग तसेच संबंधित प्रशासनाकडे निवेदन देऊन १५ ऑगस्टपर्यंत प्रभावी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, या मुदतीत ठोस कारवाई न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता चिपळूण प्रांताधिकारी कार्यालयासमोर शांततापूर्ण बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा प्रविण जाधव यांनी दिला आहे.
या निवेदनाची प्रत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनाही माहितीसाठी पाठविण्यात आली आहे. प्रशासन आता या तक्रारीवर कोणती कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.




