वीज पुरवठ्यातील सततच्या व्यत्ययाला साखरी नाटेतील ग्रामस्थ त्रस्त

जैतापूरमार्गे ११ केव्ही पर्यायी वीजवाहिनीची ग्रामपंचायतीची मागणी

राजापूर : महावितरणच्या सततच्या वीजपुरवठ्यातील व्यत्ययामुळे साखरी नाटे गावातील नागरिक, व्यापारी व मच्छी व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार साखरी नाटे ग्रामपंचायतीने केली आहे. या पार्श्वभूमीवर जैतापूर ब्रिजमार्गे येणाऱ्या ११ केव्ही आपत्कालीन वीजवाहिनीचा पुरवठा साखरी नाटे गावाला जोडून देण्याची मागणी ग्रामपंचायतीने महावितरणच्या राजापूर कार्यालयाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
साखरी नाटे हे रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाचे मच्छीमारी बंदर असून गावाची लोकसंख्या सुमारे साडेचार हजार आहे. ऐतिहासिक यशवंतगड किल्ला, मोठी बाजारपेठ आणि विविध व्यावसायिक उपक्रमांमुळे गावाला आर्थिकदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. येथे कोल्ड स्टोरेज, आईस फॅक्टरी, मच्छीपूरक उद्योग, वेल्डिंग, फॅब्रिकेशन, जाळीकाम तसेच इतर लघुउद्योग मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत.
मात्र वारंवार होणारे लोडशेडिंग, शॉर्टसर्किट, वीजवाहिन्या व पोल पडणे, पावसाळ्यात वीज कोसळल्याने होणारे नुकसान यामुळे गावाचा वीजपुरवठा अनेकदा खंडित होतो. काहीवेळा आठवडाभर वीज नसल्याने जनजीवन विस्कळीत होते. त्याचा फटका नागरिकांसह व्यावसायिकांनाही बसत असून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे ग्रामपंचायतीने निवेदनात नमूद केले आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेवरही परिणाम होत असून पाणी वितरणाचे वेळापत्रक कोलमडते. त्यामुळे ग्रामपंचायतीला ग्रामस्थांच्या नाराजीचा सामना करावा लागत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
या सर्व बाबींचा विचार करून साखरी नाटेपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या जैतापूर ब्रिज येथील ११ केव्ही आपत्कालीन वीजवाहिनी साखरी नाटे गावाशी जोडण्यात यावी, अशी मागणी कनिष्ठ अभियंता, महावितरण राजापूर (आडिवरे) यांच्याकडे करण्यात आली आहे. या पर्यायी वीजपुरवठा व्यवस्थेमुळे नैसर्गिक आपत्ती अथवा तांत्रिक बिघाडाच्या काळातही गावाचा वीजपुरवठा सुरळीत राहून नागरिक व व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा ग्रामपंचायतीने व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button