
रत्नागिरी जिल्ह्यात पाच महिन्यात ’एफडीए’च्या १५१ धाडी
रत्नागिरी जिल्हयात मार्च महिन्यापासून तब्बल १५१ ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. यात अस्वच्छता बाळगणार्या अन्न आणि औषध प्रशासन ३२ जणांना तातडीने सुधारणा नोटिसा बजावल्या आहेत. तर १५ आस्थापनांवर कारवाईचा बडगा उगारत ६० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामध्ये शहरातील शिवाजीनगर येथील एका बिर्याणी सेंटरला अस्वच्छतेप्रकरणी १३ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
शहरातील मिठाई दुकानदारांसाठी प्रशासनाने अत्यंत कडक नियमावली लागू केली आहे. या विभागाचे सहाय्यक आयुक्त ललित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने या मोहिमेला जिल्हाभरात गती दिल्याचे सांगण्यात आले आहे. यापुढे जिल्हयातील सर्व मिठाई दुकान चालकांना विक्रीसाठी ठेवलेल्या प्रत्येक मिठाईचा डबा किंवा ’ट्रे’वर उत्पादन तारीख आणि ’एक्स्पायरी’ तारीख दर्शवणारे लेबल लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाचे उल्लंघन करणार्यांवर थेट कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
अन्न सुरक्षा निरीक्षक तृप्ती घरत यांनी सर्व अन्न आस्थापनांना परिसरात सक्त चोख स्वच्छता राखण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच शाळांच्या आसपासच्या परिसरात तेलकट आणि अस्वच्छ खाद्यपदार्थांची विक्री करणार्यांवर कडक नजर ठेवली जाणार आहे. प्रशासनाच्या या धडक मोहिमेमुळे जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक, खानावळ चालक आणि अन्न व्यापार्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.



