
चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांसमोर अस्तित्वाचा प्रश्न, जिल्हा परिषद शाळांकडे पालकांची पाठ
चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असून, घटत्या विद्यार्थीसंख्येमुळे चालू शैक्षणिक वर्षात तब्बल ६ जिल्हा परिषद शाळा बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. एकेकाळी विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या ग्रामीण भागातील मराठी शाळा आता ओस पडत असून, पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांकडे वाढता कल, स्थलांतर याचा सर्वाधिक फटका जिल्हा परिषद शिक्षण व्यवस्थेला बसत आहे.
शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ७,३६६ विद्यार्थी शिक्षण घेत होते. त्यापैकी इयत्ता पहिलीत ९८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. मात्र २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात पहिलीतील प्रवेशसंख्या ८६७ वर आली असून, १२० विद्यार्थ्यांची घट झाली आहे. या घटत्या पटसंख्येमुळे अनेक शाळांमध्ये विद्यार्थीसंख्या अत्यल्प झाली असून, अखेर ६ शाळा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.




