
रत्नागिरी शहरातील कोकणनगरमधील रेशन दुकान सील
रत्नागिरी शहरातील कोकणनगर येथील रेशन दुकानात सुरू असलेल्या कथित गैरप्रकार आणि अनियमित कारभाराचा अखेर उद्रेक झाला. हक्काच्या धान्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहूनही रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याने संतप्त नागरिकांनी सकाळपासूनच रेशन दुकानासमोर एकत्र येत संताप व्यक्त केला. नागरिकांच्या या तक्रारींची दखल आणि प्राथमिक तपासणीत गंभीर अनियमितता आढळल्याने पुरवठा अधिकार्यांनी तात्काळ कोकणनगर येथील रेशन दुकान सील केले.
कोकणनगर परिसरातील नागरिकांनी रेशन दुकानाच्या अनागोंदी कारभाराबाबत प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक केतन शेट्ये आणि नगरसेविका फौजिया मुजावर यांच्याकडे वारंवार तक्रारी मांडल्या होत्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दोन्ही नगरसेवकांनी तातडीने पुरवठा विभागाशी संपर्क साधून कडक कारवाईची मागणी केली लोकप्रतिनिधींच्या या आक्रमक पाठपुराव्यानंतर पुरवठा अधिकारी सायली चव्हाण आणि अधिकारी निशा यांच्यासह पथक लागलीच घटनास्थळी दाखल झाले.




