
निवासी डॉक्टरांचे राज्यव्यापी बेमुदत आंदोलन कायम!
सीसीएमपी प्राप्त होमिओपॅथी डॉक्टरांना एमएमसी नोंदणी करण्याच्या प्रस्तावासंदर्भात बुधवारी सायंकाळी मार्डच्या प्रतिनिधींची वैद्यकीय शिक्षण व संशाेधन संचालनालयाच्या संचालक आणि एमएमसीच्या निबंधकांसोबत झालेल्या बैठकीमध्ये कोणताही तोडगा न निघाल्याने मार्डने आपले बेमुदत आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार ६ ऑगस्ट रोजीही बंद कायम असल्याचे मार्डकडून जाहीर करण्यात आले आहे.
वैद्यकीय शिक्षण व संशाेधन संचालनालयाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत मार्डच्या प्रतिनिधींनी त्यांच्या सर्व मागण्या संचालक व निबंधकांसमोर मांडल्या. या मागण्यांची बैठकीमध्ये गंभीर दखल घेऊन सर्व मागण्या तातडीने मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यात येतील तसेच येत्या काही दिवसांत सकारात्मक व ठोस निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले. तसेच काही विषय न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यांचा कायदेशीर चौकटीत विचार करण्यात येत असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
मात्र, निवासी डॉक्टरांच्या प्रमुख मागण्यांबाबत बैठकीतमध्ये कोणताही ठोस अथवा समाधानकारक निर्णय अथवा आश्वासन देण्यात आले नाही. त्यामुळे मार्डने ६ ऑगस्टपासून सुरू होणारे राज्यव्यापी बेमुदत आंदोलन नियोजित सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. निवासी डॉक्टरांच्या न्याय्य मागण्यांवर शासनाकडून अधिकृत व समाधानकारक निर्णय होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहील. असा इशारा मार्डकडून देण्यात आला. राज्यातील आरोग्य व्यवस्था तसेच निवासी डॉक्टरांच्या हितासाठी शासनाने लवकरात लवकर सकारात्मक व निर्णायक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा मार्डचे अध्यक्ष डॉ. अथर्व शिंदे, मुख्य समन्वयक डॉ. विनायक शहा तसेच बीएमसी मार्डचे सरचिटणीस डॉ. शंकर जगताप यांनी व्यक्त केले.




