आदिशक्ती अभियानात गोठणे-दोनिवडे ग्रामपंचायतीचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक


राजापूर : शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात आलेल्या आदिशक्ती अभियान स्पर्धेत राजापूर तालुक्यातील गोठणे-दोनिवडे ग्रामपंचायतीच्या आदिशक्ती महिला सक्षमीकरण समितीने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
महिलांच्या समस्या जाणून घेणे, त्यांचे सामाजिक सक्षमीकरण करणे तसेच पंचायत राज व्यवस्थेमध्ये महिलांचा सहभाग वाढवून महिला नेतृत्वाला बळकटी देणे, या उद्देशाने शासनाने २२ मे २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत आदिशक्ती अभियान राबविले होते. या अभियानांतर्गत एकूण १३ निकष निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार ग्राम, जिल्हा आणि राज्य स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत गोठणे-दोनिवडे ग्रामपंचायतीने प्रथम तालुकास्तरावर अव्वल स्थान मिळविले. त्यानंतर जिल्हास्तरीय स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांकाचा मान पटकावला.
प्रस्थापित सुविधा मर्यादित असलेल्या आणि कष्टकरी नागरिकांचे प्रमाण अधिक असलेल्या ग्रामपंचायतीसाठी या अभियानात सातत्याने काम करणे आव्हानात्मक होते. मात्र, आदिशक्ती अभियानाच्या अध्यक्षा श्रेया शिंदे, सरपंच मुकेश विचारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध उपक्रम प्रभावीपणे राबवत हे यश मिळविले.
या यशामध्ये समिती सदस्य श्रीधर हातणकर, श्रद्धा हातणकर, पोलिस पाटील श्रेया हातणकर, ग्रामपंचायत अधिकारी दिपाली वडर, पोलिस पाटील अनुजा झोरे, सायली भोसले, तसेच ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गट, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका आणि शासनाच्या विविध विभागांच्या प्रतिनिधींनी मोलाचे योगदान दिले.
गोठणे-दोनिवडे ग्रामपंचायतीने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल ग्रामस्थांसह विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button