उचवल्या येथे रस्त्यावर झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प; ग्रामस्थांनीच हटवली झाडे,

राजापूर : विठापेठ–मलकापूर–अनुस्कुरा–साटवली–पावस या राज्य महामार्गावरील ओणी–पाचल–अनुस्कुरा मार्गावर पाचल ग्रामपंचायत हद्दीतील उचवल्या परिसरात रविवारी (दि. २ ऑगस्ट) दोन ते तीन मोठी झाडे मुळासकट रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली. या घटनेमुळे वाहनचालक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
घटनेची माहिती मिळताच पाचल ग्रामपंचायत सदस्य विनायक सक्रे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने कळविले. मात्र, विभागाकडून तत्काळ घटनास्थळी अधिकारी किंवा कर्मचारी पाठविण्याऐवजी एका ठेकेदाराला माहिती देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. बराच वेळ उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
ग्रामस्थ आणि वाहनचालकांनीच घेतला पुढाकार
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करण्याऐवजी स्थानिक ग्रामस्थ आणि या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी स्वतः पुढाकार घेत रस्त्यावर पडलेली झाडे व झाडी हटविण्यास सुरुवात केली. सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प राहिल्यानंतर ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळे रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू झाले. त्यानंतर तासाभरात एकेरी वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button