
नाही तर पतंजली बंद पडेल, रामदेव बाबांच्या वक्तव्यावर अभिजीत दिपकेंचे प्रत्युत्तर
देशात सध्या जेन झींवरून मोठा वाद सुरू झाला आहे. काही लोक या झेन जींना समर्थन करत आहेत, तर काहींकडून या पिढीच्या संस्कारांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. योगगुरू आणि उद्योगपती म्हणून ओळख असलेले बाबा रामदेव यांनीही या जेन झींवर सडकून टीका केली आहे. जेन झीने भारताला बदनाम केले. शिव्यांची वाखोली हे काही आपली संस्कृती आणि नैसर्गिक भाव नाही. आम्ही वयाने मोठ्या व्यक्तींचा नेहमी आदर केला आहे. आई- वडील आणि गुरूंचा आम्ही नेहमी सन्मान केला आहे. त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावरूनच आपण पुढे जात आहोत. रस्त्यांवर उतरून देश चालणार नाही. देश हा संसदेतून आणि संविधानाआधारे चालतो. देशाचा शिक्षण मंत्री कोण असेल अथवा नसेल हे रस्त्यावर नाही ठरवता येणार, हे संसदेत ठरेल. देशाचे पंतप्रधान आणि संसद ते ठरवेल, अशी टीका बाबा रामदेव यांनी जेन झींच्या आंदोलनावर केली.रामदेव बाबा यांनी केलेल्या या टीकेला आता सीजेपी संस्थापक अभिजीत दिपके यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले की, आम्ही काय देशाची बदनामी केली? लोकशाहीसाठी लढणे ही बदनामी आहे का? आपल्या हक्कांसाठी लढणे ही बदनामी आहे का? लोकशाहीसाठी लढणे याला बदनामी म्हणतात का? महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो घेऊन आम्ही आंदोलनात चालत होतो. ही जर देशाची बदनामी असेल तर रामदेवबाबांना सांगा आम्ही देश बदनाम करतोय, तुम्ही पतंजलीची उत्पादने आहेत, ज्यामध्ये भेसळ आहे असे सुप्रीम कोर्ट म्हणत आहे, त्याकडे लक्ष द्या. बाकी झेन जी लोकतंत्र, देश सांभाळू शकतो, तुम्ही पतंजलीच्या उत्पादनांच्या दर्जाकडे लक्ष द्या नाहीतर पतंजली बंद होईल, असे म्हणत अभिजीत दिपकेंनी रामदेव बाबांना उत्तर दिले आहे.




