
कळबणी स्मशानभूमीजवळील पूल तीन दिवसांपासून खचला; वाहतुकीवर परिणाम, ग्रामस्थांकडून तातडीच्या दुरुस्तीची मागणी
खेड : तालुक्यातील वडगाव येथील कळबणी स्मशानभूमीजवळ जगबुडी नदीलगत असलेला पूल गेल्या तीन दिवसांपासून खचलेल्या अवस्थेत असल्याने परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पूल दुरुस्तीचे काम अद्याप सुरू न झाल्याने ग्रामस्थांना दैनंदिन प्रवासात अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या मार्गाचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना गैरसोयीचा सामना करावा लागत असून, वयोवृद्ध, महिला आणि अन्य नागरिकांनाही पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे.
पूल खचल्यामुळे या मार्गावरील राज्य परिवहन (एसटी) बससेवाही प्रभावित झाली असून, सध्या बस सेवा किंजळे गावापर्यंतच सुरू आहे. पुढील गावांतील नागरिकांना पायी किंवा खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्तीचे काम हाती घ्यावे आणि वाहतूक पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.




