
आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालायं, त्यांना काही सांगणंही अवघड.’जेन झी’ बद्दल विश्वास नागरेंचं विधान चर्चेत
जेन झी पिढी सतत मोबाईलवर असते त्यामुळे त्यांच्या विचार क्षमतेवर परिणाम होऊन त्यांच्या डोक्यात केमिकल लोचा झाला असल्याचं मत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) यांनी व्यक्त केलंय.ते सोमवारी कारगिल विजय दिनानिमित्त भोसले मिलिटरी स्कूलतर्फे आयोजित कार्यक्रम सोहळ्यात बोलत होते. त्यांच्या या विधानाची आता सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.पुढे बोलताना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील म्हणाले, आजच्या पिढीचा स्क्रीन टाईम मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सतत मोबाईल स्क्रोल करण्याच्या सवयीमुळे विचार करण्याची आणि भावनिदृष्ट्या परिस्थिती हाताळण्याची क्षमता प्रभावित होत आहे. एकंदरी केमिकल लोचा झाला आहे, तसेच बौद्धिक भावनिक सामाजिक विकासाबरोबरच कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकदही प्रत्येकामध्ये विकसित होणे गरजेचे असल्याचं विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्ट केलंय.जेन-झी’ ही देशाचे भविष्य आहे. मात्र, आजच्या काळात त्यांना काही सांगणंसुद्धा अवघड झालं आहे. पोलीस असोत किंवा सीमेवरील जवान, त्यांची सेवा ही कधीही न थांबणारी असते. कितीही काम केलं तरी टीका आणि शिव्या पोलिसांच्या वाट्याला येतात. गेल्या काही दिवसांपासून तर मीच अधिक शिव्या खातोय, असंही विश्वास नांगरे पाटील म्हणाले आहेत.




