नापास झाला अन् परीक्षा पुन्हा घ्यावी म्हणून रचला पेपरफुटीचा बनाव; MPSC पेपरफुटीचा दावा ठरला खोटा


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक भरती परीक्षेबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि राजकीय स्तरावर पेपरफुटीची जोरदार चर्चा सुरू होती. परीक्षा होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा करण्यात आला होता
या आरोपांची गंभीर दखल घेत आयोगाने तातडीने चौकशी केली. तपास पूर्ण झाल्यानंतर पेपरफुटीचे आरोप निराधार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागातील गट-ब संवर्गातील 154 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. या पदांसाठी 22 मार्च 2026 रोजी राज्यातील 6 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर 12 जून 2026 रोजी निकाल जाहीर करण्यात आला. पुढे 22 जुलै 2026 रोजी अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आणि भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली.दरम्यान, गौरव पाटील नावाच्या व्यक्तीने 21 जुलै रोजी एमपीएससीला ई-मेल पाठवून प्रश्नपत्रिका 20 मार्चलाच बाहेर आल्याचा आरोप केला होता. या तक्रारीनंतर आयोगाने संबंधित बाबींची सखोल चौकशी केली. तपासादरम्यान व्हायरल झालेली प्रश्नपत्रिका आणि प्रत्यक्ष परीक्षेत विचारण्यात आलेली प्रश्नपत्रिका यांचा कोणताही संबंध नसल्याचे समोर आले.

चौकशीत आणखी एक महत्त्वाची बाब उघड झाली. तक्रार करणारी व्यक्ती या भरती परीक्षेत अपयशी ठरली होती. परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, या उद्देशाने पेपरफुटीचा खोटा दावा करण्यात आल्याचे तपासातून स्पष्ट झाले.एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सोशल मीडियावर फिरणारी प्रश्नपत्रिका ही मूळ प्रश्नपत्रिका नसून पेपरफुटीचे सर्व आरोप चुकीचे असल्याचे तपासात सिद्ध झाले आहे. आयोगाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

या प्रकरणात चुकीची माहिती पसरवून आयोगाची बदनामी केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही आयोगाने दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button