
भरणे नाका पुलावरून कोसळलेला मॅगीने भरलेला कंटेनर तीन-चार किलोमीटर वाहत देवणे परिसरात
धाडसी तरुणांनी दोरीने बांधून रोखला, नदीपात्रात मॅगीचे पाऊच विखुरले

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे नाका येथील जगबुडी नदीच्या पुलावरून २२ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गोव्याहून मुंबईकडे जाणारा मॅगीने भरलेला कंटेनर नदीत कोसळून भीषण अपघात झाला होता. नदीच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेलेला हा कंटेनर तब्बल चार दिवसांनंतर सोमवारी खेड शहरालगतच्या देवणे परिसरात नदीत तरंगताना आढळून आला. कंटेनर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.
अपघातानंतर कंटेनरचा शोध सुरू होता. मात्र, नदीच्या वेगवान प्रवाहामुळे तो तीन ते चार किलोमीटर अंतर वाहत गेला. अखेर खेड शहराजवळील देणे परिसरात तो दिसून आला. ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी नदीकिनारी मोठी गर्दी केली.
दरम्यान, कंटेनर आणखी पुढे वाहून जाऊ नये म्हणून काही धाडसी तरुणांनी जीवाची पर्वा न करता नदीत उडी घेतली. दोरीच्या साहाय्याने कंटेनरला बांधून त्याच ठिकाणी रोखून धरण्याचा प्रयत्न करण्यात आला. या तरुणांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात मॅगीचे पाऊच भरलेले असल्याने कंटेनरमधील माल नदीच्या पाण्यात विखुरला. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मॅगीचे पाऊच पसरल्याने पर्यावरणाबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.
चार दिवसांपूर्वी झालेल्या या भीषण अपघातातील कंटेनर अखेर समोर आल्याने या दुर्घटनेची पुन्हा एकदा खेड तालुक्यात चर्चा रंगली असून, पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




