विटेवर अवतरला विठुराया; देवरुखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास रहाटेंचा अनोखा कलाविष्कार


आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणात देवरुखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे यांनी यंदा पुन्हा एकदा आपल्या अनोख्या कल्पकतेची छाप उमटवली आहे. यावेळी त्यांनी स्वतः तयार करून भाजलेल्या मातीच्या विटेवर श्री विठ्ठलाची आकर्षक रांगोळी साकारत भक्ती आणि कलेचा सुंदर संगम घडवून आणला.

नदीकाठावरील मऊ मातीपासून छोटी वीट तयार करून ती भाजल्यानंतर अवघ्या एका तासात रहाटे यांनी त्या विटेवर सूक्ष्म आणि देखणी श्री पांडुरंगाची प्रतिमा रांगोळीच्या माध्यमातून साकारली. साध्या विटेला त्यांनी आपल्या कलेच्या स्पर्शातून भक्तिमय रूप दिल्याने ही कलाकृती विशेष आकर्षणाचा विषय ठरली आहे.

विलास रहाटे हे दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने वेगवेगळ्या माध्यमांवर विठ्ठलाची रांगोळी साकारून नवनवीन प्रयोग करत असतात. यापूर्वी त्यांनी तुळशीच्या पानावर, मोरपीसावर तसेच पाण्याखाली श्री विठ्ठलाची रांगोळी साकारून रसिकांची वाहवा मिळवली आहे. त्यांच्या या अनोख्या कलाकृतींमुळे त्यांना देश-विदेशात विशेष ओळख मिळाली आहे.

यंदाच्या विटेवरील श्री विठ्ठलाच्या रांगोळीनेही कला आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळत असून, रहाटे यांच्या कल्पकतेचे आणि विठ्ठलावरील नितांत श्रद्धेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button